Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 12881 नवे रुग्ण तर 334 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 12 हजार 881 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 334 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, आता देशात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 66 हजार 946 आहे, ज्यामध्ये 12 हजार 237 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत 7 हजार 390 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान देशात कोरोना विषाणूशी लढून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 94 हजार 325 झाली आहे. त्याचबरोबर देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख 60 हजार 384 इतकी आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण रुग्ण 1 लाख 16 हजारांच्या वर आहेत, तर दिल्लीत 47 हजारांहून अधिक लोक संक्रमित आहेत.

दिल्लीत बुधवारी कोरोना विषाणूची लागण होण्याची 2414 नवीन प्रकरणे नोंदली गेली. यानंतर दिल्लीत कोरोना विषाणूच्या संक्रमित लोकांची एकूण संख्या 47,102 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे दिल्लीत 67 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1904 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाची 3307 नवीन प्रकरणे समोर आली असून 114 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण मृतांची संख्या 5651 इतकी आहे. राज्यात एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 16 हजार 752 आहे. यापैकी 51 हजार 921 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 59 हजार 166 लोक बरे झाले आहेत. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे एकूण रुग्णांची संख्या वाढून 61 हजार 587 झाली आहे, त्यामध्ये 3 हजार 244 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 1359 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत सक्रिय प्रकरणांची संख्या 26 हजार 997 आहे.