देशात ‘कोरोना’ समूह संसर्गाच्या टप्प्यात, अखेर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यानी आज (रविवार) दिली. पण हा समूह संसर्ग केवळ काही जिल्ह्ये आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

राज्यात समूह संसर्गीची प्रकरणं समोर आल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. यावरुन इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरु आहे का ? असा प्रश्न हर्षवर्धन यांना विचारण्यात आला. पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करुन दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाहीए. हा फक्त मर्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे, असं हर्षवर्धन म्हणाले. हर्षवर्धन यांनी हे वक्तव्य त्यांच्या रविवारच्या ‘रविवार संवाद’ वेबिनारमध्ये दिलं.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जुलैमध्ये एक मार्गदर्शन दस्तऐवज जारी केले होते. ज्यात एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात भारतात समूह संसर्ग सुरु झाल्याचे नकळतपणे उघड झालं होतं. हे दस्तऐवज नंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आले होते.