Coronavirus : ‘कोरोना’मुळं बुध्दिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदही जर्मनीत अडकला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धेतील सामने रद्द करण्यात आले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर अनेक रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान, क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. या यादीत आता बुद्धिबळाचाही समावेश झाला आहे. बुंडेस लीग चेसमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला विश्वनाथन आनंद एससी बॅडेनसाठी खेळत होता. तो सध्या जर्मनीमध्ये असून कोरानामुळे इव्हेंटही कॅन्सल करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदला भारतात परतण्यात अडचणी येत आहेत. आनंद काल भारतात परतणे अपेक्षित होते. मात्र भारतासह जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वनाथन आनंद यांनी जर्मनीतच राहणे पसंत केले आहे.

एक आठवडा आधी तो सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला आहे. विश्वनाथनच्या पत्नीने बोलताना सांगितले की, ’मला फार भीती वाटत आहे की, तो तिकडे आहे. परंतु, मला याहीगोष्टीचा आनंद आहे की, त्यांची प्रकृती उत्तम आहे. मी फक्त प्रार्थना करत आहे की, या महिना अखेरपर्यंत त्यांनी भारतात परत यावे.’ सध्या आनंदला आपल्या कुटुंबाची आठवण येत आहे. तसेच जर्मनीतून आनंद इंटरनेटमार्फत मित्र आणि कुटुंबियांसोबत चॅट करत आहे. तसेच आपला मुलगा आणि पत्नीसोबत तो व्हिडीओ कॉलवरही संपर्कात आहे.