भारत शेजारील देशांना मदत करणार, टीम तयार पण पाकिस्तानचं…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलंय. भारतात कोरोना संसर्गाचे २० हजार ४७१ रुग्ण झाले आहे. तर ६५२ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र अशी भूमिका घेऊन भारताने स्वतःची काळजी घेतानाच आपल्या शेजारील देशांना देखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वेगवेगळ्या दलांची आखणी करून हे दल बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान येथे मदतीसाठी रवाना होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने आपल्या मित्र देशांना शक्य तेवढी मदत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानला मदत पुरविण्यासाठी या दलाची तयारी सुरु आहे. ‘सार्क’ (SAARC) क्षेत्रात या जीवघेण्या आजाराशी लढताना भारत मुख्य भूमिकेत उभा राहिलाय. वर्तमानात ‘सार्क’ अंतर्गत येणारे सगळेच देश कोरोना संसर्गाची लढताना सामाजिक आणि आर्थिक तोटा सहन करत आहे.

मागील महिन्यात भारताचं एक १४ सदस्याचं पथक मालदीवमध्ये कोरोना संसर्गासंबंधी एक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी पाठविण्यात आलं होत. या दलाने स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात मदत केली. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय सेनेचं १५ सदस्यीय एक पथक द्विपक्षीय सहकार्याचा भाग म्हणून कुवैतला पाठविण्यात आलं होत.

१५ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘सार्क’ (SAARC) देशातील नेत्यांसोबत संवाद साधला होता. तसंच कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी रणनीती आखत एक आपत्कालीन कोष बनविण्याचा विचार देखील मांडला होता. या कोषात भारत मार्फत एक कोटी डॉलरची मदत देण्याची घोषणाही पंतप्रधानांकडून करण्यात आली होती. या आधी मित्र देशांना मदत पुरविताना भारतानं अमेरिका सोबत ५५ देशांना ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ औषधांचा पुरवठा केला होता.