Coronavirus Lockdown : देशातील बेरोजगारी वाढल्याने एप्रिलमध्ये 12 कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्या

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका देशाला बसला असून अर्थव्यवस्थेबरोबरच रोजगाराचे नुकसान झाले आहे.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीने (सीएमआयई) दिलेल्या माहितीनुसार 3 मेपर्यंत देशामधील बेरोजगारांच्या संख्या 27.1 टक्क्यांवर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये देशातील 12 कोटी 15 लाख लोक बेरोजगार झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग मार्चमध्ये वाढू लागल्यानंतर बेरोजगारांची टक्केवारी सात टक्के इतकी होती. दरम्यान दीड महिन्यानंतर शहरांमध्ये बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून येथील बेरोजगारांची टक्केवारी 29.22 टक्के इतकी आहे. कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या ‘रेड झोन’मध्ये बेरोजगार होणार्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे. बेरोजगार झालेल्यांपैकी 9 कोटी 13 लाख लोक हे मजदूर आणि लहान उद्योगांमध्ये काम करणारे कामगार आहेत. 1 कोटी 82 लाख लहान उद्योगांशी संबंधित तर 1 कोटी 78 लाख नोकरदार एप्रिलमध्ये बेरोजगार झाल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे शेती करणार्‍यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. 20 एप्रिलनंतर 5 कोटी 80 लाख लोकांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे. करोनामुळे इतर उद्योग बंद असेल तरी शेतीसंबंधित कामांना यामधून वगळण्यात आले आहे. ग्रामीण भागांमध्ये बेरोजगारीची टक्केवारी 26.69 टक्के इतकी आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्च रोजी केली होती. त्याचवेळी अनेकांनी देशामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्र सरकारला दिला होता. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. तसेच दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरामधून स्थलांतरित मजदुरांनी आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.