Coronavirus : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या महामारीमुळं 9 दिवसांमध्ये तिघा भावांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी गावात राहणाऱ्या कलापुरे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. अवघ्या नऊ दिवसात कोरोनाचे उपचार घेत असताना तीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरीगाव आणि कलापुरे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

पोपटराव कलापुरे (66), ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली कलापुरे (63) आणि दिलीपराव कलापुरे (61, सर्व रा. पिंपरीगाव) असे करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. 5 जुलै रोजी त्यांच्या कुटूंबातील एका मुलास कोरोनाची लागण झाली. त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने घरातील सर्व 18 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये कुटूंबातील सर्वचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

पोपटराव, ज्ञानेश्‍वर आणि दिलीपराव या तिघांनाही ह्रदयासंबंधित आजार होते. आपल्याला करोना झाल्याची धास्ती या तिघांनीही घेतली. यापैकी दिलीप यांना प्रथम अतिदक्षता विभागात व्हॅन्टीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर पोपटराव आणि ज्ञानेश्‍वर यांनाही श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिघांनाही अतिदक्षता विभागात व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. 10 जुलै रोजी उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाला. यामुळे पोपटराव आणि ज्ञानेश्‍वर हे आणखीनच घाबरले. त्यानंतर पोपटराव यांचा 15 जुलै रोजी तर ज्ञानेश्‍वर यांचा 17 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच घरातील तीन भावंडांचा कोरोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याने कलापुरे कुटूंबियांवर शोककळा पसरली.