कोरोनाच्या भीतीमुळे आता वाढला ‘हा’ त्रास, डॉक्टरांकडे येणार्‍यांचे प्रमाण वाढले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे वाढलेली आरोग्याची धास्ती अन् लॉकडाऊन यामुळे अनेकांना नैराश्य आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पुढे काय होईल या भीतीने अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. सततच्या अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. कोरोना काळात डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. स्वाभाविकच निद्रानाश हा वाढलेल्या अनावश्यक तणावामुळे होतो आणि हा तणाव सद्यस्थितीत वाढलेल्या एकलेपणामुळे वाढत आहे.

याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले की, हल्ली मानसिक स्वास्थ्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली नक्कीच आहे. सर्वाधिक रुग्ण केवळ आणि केवळ झोपेच्या तक्रारी घेऊन येत आहेत. या तक्रारी क्लिनिकल डिप्रेशनच्या नाहीत. सवय नसलेल्या गोष्टी अचानक जीवनात आल्या की या समस्या येतात. लॉकडाऊन ही अनपेक्षित घडलेली क्रिया आहे. त्यामुळे अशा क्षुल्लक तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्तीचे गणित तुमच्या समाधानाशी निगडित आहे. एका अर्थी संकटात दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद सर्वाधिक असतो. त्यामुळे मदतीसाठी सज्ज राहा, तुमची इम्युनिटी नक्की वाढेल. सतत रडगाणे न गाताच वास्तवाचा सामना करा आणि मला हे बदलवता येते, हे स्वत:लाच सांगा. योग शिकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आशेवर जगणे हे उत्तम टॉनिक असल्याचे ते म्हणाले.

तणाव वाढण्याची कारणे

1) लॉकडाऊनमुळे घरातच बंदिस्त असणे.

2) घरात राहायची सवय नसल्याने अन् बाहेर पडता येत नसल्याने नैराश्य वाढणे

3) वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडणे

4) मित्र/मैत्रिणींशी संवाद तुटल्याने

5) साचेबद्ध आयुष्य झाल्याने तणाव वाढत जातो.

तणाव दूर करण्यासाठी काय कराल

1) सर्वप्रथम जे घडत आहे, त्याचा स्वीकार करणे

2) माझा लाभ कशात आहे, याचे चिंतन करणे

3) संकटाला देवाने दिलेली संधी समजून वागणे

4) असा वेळ कधीच भेटणार नव्हता, तो मिळाला म्हणून छंद जोपासा, सिनेमे पहा, पुस्तके वाचा,

5) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता नको तर काळजी घ्या.

सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

1) मला झोप का येत नाही?

2) ही अनिश्चितता कधी संपेल?

3) दिवस कसा काढावा, समजत नाही?