Coronavirus Impact : कोरोनामुळं MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, मॉल, जलतरण तलाव बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोना रुग्णांचा आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच या परीक्षा 30 तारखेनंतर घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत असे ही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 32 वर पोहचली आहे. त्यातील 9 जण कस्तुरबा गांधी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. तर, कस्तुरबा गांधी रुग्णालयात एकूण 80 रुग्ण दाखल आहेत. कोरोना रुग्णांना टीव्ही, वायफाय, जेवण यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. येत्या 15 ते 20 दिवसात पुण्यात नव्या लॅबची सुविधा देणार आहे. डॉक्टरांना लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय सोलापूर, मिरज, धुळे आणि औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पुढील 15 दिवसात अशी यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरु असल्याचे टोपे यांनी सांगितले.