coronavirus : चौकाचौकात तपासणी केंद्रे, माफक दरात तपासण्या करा, टास्क फोर्सच्या शिफारशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असणार्‍या टास्क फोर्सची स्थापना राज्य सरकारने केली आहे. कोरोनाच्या रुग्णांची उपचारपद्धती निश्चित झाली असली तरी टास्क फोर्स चालूच राहील. टास्क फोर्सने सरकारला वेळोवेळी शिफारशी कराव्यात, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत, अशी माहीती सूत्रांनी दिली. दरम्यान या टास्क फोर्सने तपासणी केंद्रे आणि मास्कसंबंधी काही महत्वाच्या शिफारशी सरकारला केल्या आहेत.

काही महत्वपूर्ण शिफारशी टास्क फोर्सने राज्य सरकारला करताना म्हटले आहे की, लोकांनी मास्क न वापरता बाहेर फिरणे अत्यंत धोकादायक असल्याने सरकारने येत्या काळात जनतेला मोफत अथवा नाममात्र दरात मास्क द्यावेत. शिवाय चौकाचौकात कोरोना तपासणी करणारी केंद्रे सुरू करावीत. तसेच मुंबईतील खासगी आस्थापनांची कायार्लये दोन शिफ्ट मध्ये चालवावीत.

या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. ओक यांनी सध्याच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त करताना म्हटले की, संपूर्ण जगाचा आढावा घेतला तर फारशी आशादायी परिस्थिती नाही. काही देशात दुसर्‍या टप्प्यात संचारबंदी लावण्याची वेळ आली आहे. आपण मात्र लॉकडाऊन पूर्णपणे काढून टाकल्यासारखे वागत आहोत.

डॉ. ओक पुढे म्हणाले, गणपतीच्या उत्सवात लोक एकमेकांच्या घरी गेले. या काळात संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. दिवाळीत देखील एकमेकांच्या घरी जाण्याची प्रथा आहे. अशाप्रकारे लोक मास्कशिवाय आणि सॅनिटायझरच्या वापराशिवाय एकमेकांना भेटू लागले तर पुन्हा लाट यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हा आजार अतिशय गंभीरपणे घेण्याची गरज आहे, असे इशारा त्यांनी दिला.

असंख्य लोक आजही मास्कशिवाय फिरत आहेत. त्यांना दंड लावला तर त्याचे पैसे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे सरकारने आधी मास्क मोफत द्यावेत, फार फार तर एक रुपया, दोन रुपये त्याची किंमत ठेवावी. पण हे करूनही जर लोक मास्क वापरत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच चौकाचौकात कोरोना तपासण्यांची तात्पुरती सेंटर उभी करावीत. लोकांनी पुढे येऊन तपासणी करावी, यासाठी नाममात्र शुल्क ठेवावे. पुढचे दोन आठवडे विनामूल्य तपासणी करता येते का ते पाहावे. तसे झाले तर आपल्याकडे तिसर्‍या टप्प्यातील कोरोनाची लाट आपण पूर्णपणे नियंत्रणात आणू शकू, अशा शिफारशी सरकारला केल्याचे डॉक्टर ओक यांनी सांगितले आहे.