…तर पावसाळ्यात 5 पटीनं वाढू शकतो कोरोनाचा प्रसार ! IIT चा भीती वाढवणारा ‘रिसर्च’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. इतके दिवसांचे लॉकडाऊन, इतर प्रतिबंध आदी उपाययोजना करूनही दररोज नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण खुपच जास्त आहे. उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा काहींचा समज होता, परंतु तो चुकीचा असल्याचे तज्ज्ञांनी त्यावेळी म्हटले होते. आता पावसाळा सुरू होत असताना, काहीशी गंभीर बामती येऊन धडकली आहे, ती म्हणजे पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अनेक पटीने वाढू शकतो.

कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदल या विषयावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने अभ्यास केला आहे. यामध्ये असे आढळून आले आहे की, पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात टिकू शकतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी केला आहे.

या दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणार्‍या ड्रॉपलेटचा अभ्यास केला. त्यानंतर या ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील 6 शहरांमध्ये दररोज होणार्‍या संसर्गाची तुलना केली असता त्यांना असे आढळून आले की, कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात कोरोना व्हायरसचे अस्तित्वाचा दर 5 पट जास्त आहे. लवकरच मान्सून सुरू असताना संशोधकांनी दिलेल्या या इशार्‍यामुळे धोका आणखी वाढला आहे.

याबाबत प्राध्यापक अमित अग्रवाल यांनी सांगितले की, पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून जास्त असल्याने कोरोनाचा संसर्ग जास्त वेगाने होऊ शकतो. यामुळे मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

निरोगी रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या जास्त असली तरी, मृतांचा आकडा कमी आहे. भारतात आतापर्यंत 7745 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 2.80% आहे. जगातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारत सध्या 6 व्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन नंतर भारताचा क्रमांक आहे. परंतु, भारताचा मृत्यूदर रशिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. रशियाचा मृत्यूदर 1.27% आहे. तसेच भारतात सध्या 1 लाख 33 हजार 632 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून 1 लाख 35 हजार 205 रुग्ण बरे झाले आहेत. भारतात 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.