Coronavirus : प्रतिबंधाचा दुसरा टप्पा ! ‘या’ देशात पुन्हा 21 दिवसांचा कठोर लॉकडाऊन

जेरूसलेम : पोलीसनामा ऑनलाइन –  जगामध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणे काही दिवसांसाठी कमी झाली, परंतु पुन्हा दुसर्‍यांदा प्रकरणे वाढू लागली आहेत या कारणांमुळे जगात प्रतिबंधाचा दुसरा टप्पा सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इस्त्रायल जगातील पहिला देश आहे, ज्याने दुसर्‍यांदा राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये लोकांना आपल्या घरापासून 500 मीटरपेक्षा दूर जाण्याची परवानगी असणार नाही.

इस्त्रायलने तीन आठवड्यापर्यंत दुसर्‍यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. रात्री उशीरा पत्रकार परिषदेत पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दुसर्‍यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, शुक्रवारी 2 वाजल्यापासून राष्ट्रीय लॉकडाऊन लागू होत असून ते तीन आठवडे चालेल.

नेत्यानाहू म्हणाले, मला माहित आहे की, या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल. जर आपण नियमांचे पालन केले तर कोरोना व्हायरसला पराभूत करू शकतो. वॅक्सीन सुद्धा येत आहे आणि फास्ट टेस्टींग सुद्धा.

सरकारनुसार, नॅशनल लॉकडाऊनमध्ये सर्व पब, रेस्टॉरंट (डिलिव्हरी वगळून), दुकाने आणि रिक्रिएशनल फॅसिलिटी बंद राहतील. शाळा सुद्धा बंद राहतील आणि लोकांना आपल्या घरापासून 500 मीटरपेक्षा दूर जाण्याची परवानगी असणार नाही.

लोकसंख्येच्या हिशेबाने इस्त्रायलवर कोरोना अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. इस्त्रायलची लोकसंख्या सुमारे 88 लाख आहे, परंतु येथे 37,400 पेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. रविवारी 3100 पेक्षा जास्त लोक पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 156,596 आहे आणि किमान 1119 लोकांचा मृत्यू झाला आहे.