पुण्यात महत्त्वपूर्ण निर्णय, ‘कोरोना’ चाचणीची माहिती पालिकेला देणे बंधनकारक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे संक्रमण सर्वाधिक आहे. पुणे शहरामध्ये दररोज होत असलेल्या कोरोनाच्या साधारण 50 टक्के चाचण्या ह्या खासगी लॅबमध्ये होत आहेत. ज्याचा रिपोर्ट सर्वात आधी रुग्णांना मिळतो आणि त्यानंतर 24 तासांनी महापालिकेला दिला जातो. त्यामुळे या 24 तासात कोरोना रुग्णांना स्वत: शहरात रुग्णालयात बेड शोधण्यासाठी फिरावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईप्रमाणे पुण्यात देखील खासगी लॅबनन कोरोना चाचणी करण्याची माहिती महापालिकेला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी हे आदेश काढले आहे. पुण्यात सध्या 11 खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. या सर्व लॅबना आता कोरोना रुग्णाची इत्यंभूत माहिती सर्वात आधि महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे संबंधित कोरोनाबाधित रुग्णाला तात्काळ उपचार देता येणार आहेत. सध्या खासगी लॅबमार्फेत टेस्ट केल्या जाणाऱ्या रुग्णांची खासगी हॉस्पिटलमार्फत बेसुमार लुट होत आहे. अशा रुग्णांच्या उपचारासंबंधीचा निर्णय आता पालिका घेणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह टेस्टची कॉपी रुग्णासोबतच पालिकेला देणं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी, सरकारी रुग्णालय आणि प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना संसर्गित आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, याकरिता सर्व डॉक्टरांनी खबरदारी घेण्यात यावी. तसेच वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांमध्ये अधिक विश्वास निर्माण करावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.