Coronavirus : ‘कोरोना’चा हाहाकार ! ‘या’ देशातील एकाच दिवसात तब्बल 627 जणांचा बळी, जगभरात 11 हजार रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र इटलीमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक असून इटली कोरोनाचे केंद्र बनले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे एकाच दिवसात तब्बल ६२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या ११ हजारांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत बघितले तर या विषाणूमुळे सर्वाधिक मृतांचा आकडा हा चीनमध्ये होता. मात्र शुक्रवारपासून ही संख्या इटलीमध्ये वाढताना दिसत आहे. इटलीमध्ये २४ तासांत तब्बल ६२७ लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत इटलीत ४०३२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे प्रमाण आता चीनपेक्षा अधिक झाले आहे. इटलीमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे की, लष्कराला रस्त्यावर उतरवण्याची वेळ सरकारवर आली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार लोमबार्डीमध्ये रुग्णालयातील सर्व आयसीयू रुग्णांनी भरले आहेत. तथापि, रुग्णांसाठी जागाच शिल्लक उरलेली नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना दुसऱ्या शहरातील रुग्णालयात पाठवले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी तात्पुरते रुग्णालये उभारण्यात आले आहेत तरीही रुग्णांना रुग्णालयात जागा मिळत नाही. दरम्यान इटलीने लॉकडाऊन ३ एप्रिलपर्यंत वाढवले आहे.

कोरोना विषाणूमुळे युरोपमध्ये ५ हजारांच्या पुढे मृतांचा आकडा गेला असून इटलीनंतर आता फ्रांस आणि जर्मनीमध्ये देखील लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.