Coronavirus : ‘उद्धव व्हायरस’ पेक्षा कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघणं चांगलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 10 हजार पेक्षा अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 52 रुग्ण आढळले आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना राजकीय वातावरण देखील पेटलं आहे.
राज्यातली सत्तासंघर्षात शिवसेना नेते संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधायचे. अनेकदा या पत्रकार परिषदेवर भाजप नेत्यांनी टीका केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. कोरोनाबाबत जनजागृती आणि माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे नियमित पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे लोकांना माहिती मिळत असते ही पत्रकार परिषद बघणे चांगले आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

कोरोनावरून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केलेल्या पोस्टवरून वादंग निर्माण झालं असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. ही पत्रकार परिषद संजय राऊत यांच्या उद्धव व्हायरस राज्यात येणार यापेक्षा चांगली आहे, असा चिमटा नितेश राणे यांनी काढला आहे.

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचं महाराष्ट्रातून कौतूक होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे टोपे यांच्या आईवर मुंबईतली बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, टोपे यांना आईला भेटायलाही वेळ नाही. त्यांचा रोजचा दिवस कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात, उपाययोजना, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात जातो. त्यांच्या या संवेदनशीलतेचं सोशल मीडियातून कौतूक होत आहे.