Lockdown : ‘कोरोना’वरून बीडमध्ये क्षीरसागर ‘काका-पुतण्या’मध्ये वातावरण तापण्याची शक्यता

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा बंदी तोडून मुंबईहुन बीडला आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून त्यांचे इतरत्र होम क्वारंटाईन करावे अशी मागणी, पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती. मात्र, पोलीस आयुक्तांच्या परवानगीनेच औरंगाबाद येथून आल्याचे स्पष्ट करत कोरोनाच्या संकटातही काही लोक बालिश राजकारण करत असल्याचा टोला जयदत्त क्षीरसागर यांनी लगावला. त्यामुळे कोरोनावरून बीडमध्ये काका-पुतण्यामधील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

जयदत्त क्षीरसागर हे शनिवारी आपल्या कुटुंबियांसह खासगी वाहनाने जिल्ह्यात दाखल झाले. शहरातील नगर रस्त्यावरील बंगल्यातच क्षीरसागर व राजकीय विरोधक पुतणे आमदार संदीप क्षीरसागर राहतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जयदत्त क्षीरसागर हे जिल्हाबंदी तोडून आले असून त्यांच्यापासून संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यांची रुग्णालयात तपासणी करून शासकिय किंवा इतर ठिकाणी अलगीकरण करावे, अशी तक्रार आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. आता पोलीस काय कारवाई करता याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्याला शासकिय नियम माहित असल्याने पोलीस आयुक्तांच्या रितसर परवानगीनेच बीड जिल्ह्यात आलो आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी पूर्ण कौशल्य आणि शक्ती लावण्याऐवजी काही लोक उथळ आणि बालिश पद्धतीने आरोप करत आहेत. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात असल्याचे सांगत राजकारण करण्यासाठी मैदान मोकळे आहे असा टोलाही पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला. याच मुद्यावरून आता काका-पुतण्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसू लागले आहेत.