Coronavirus : ‘भावी’ पत्नीला भेटायला गेला ‘डॉक्टर’, लॉकडाऊनमुळे अडकला ‘सासुरवाडीत’, अन् मग

बीकानेर : वृत्तसंस्था – संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. भारतातही 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आणि कार्यक्रम ठप्प झाले आहेत. देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर जोधपूर येथील डॉक्टर आपल्या भावी पत्नीला पहायला बीकानेर येथे गेला अन् तिथेच अडकला.

जोधपूरमध्ये राहणारे आणि अहमदाबादमध्ये काम करणारे डॉक्टर विवेक मेहता यांचा साखरपुडा बीकानेर येथील पूजा चोपडा यांच्याशी झाला होता. विवेक भावी पत्नी पूजाला भेटण्यासाठी गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे ते सासरवाडीतच अडकले. लॉकडाऊन वाढल्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. जावयाला लग्न न करता घरात किती काळ ठेवायचं असा प्रश्न मुलीच्या कुटुबीयांना सतावू लागला. अखेर 30 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाचं आणि मुलींच लग्न लावून दिलं. या अजब लग्नाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.

पत्नीच्या गावी पोहचला अन्
भावी पत्नी पूजाला भेटण्यासाठी डॉक्टर विवेक बिकानेरच्या गंगाशहर येथे पोहचला. बिकानेरमध्ये आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊनमुळे सर्व रेल्वे सेवा बंद झाली. त्यामुले विवेक यांना परत अहमदाबादला जाणं कठीण झालं. त्यामुळे नाईलाजाने त्यांना सासरवाडीतच थांबावे लागले. देशातील लॉकडाऊन 15 एप्रिल रोजी संपल्यानंतर परतण्याचा विचार केला. मात्र, 15 एप्रिलपासून पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला.

अखेर दोघांचे लग्न लावले
जावयाला लग्नाच्या आधी घरात ठेवणे योग्य नसल्याने मुलीच्या वडिलांनी बीकानेरमधील गंगाहरच्या जैन समाजाच्या अध्यक्षांना त्यांची अडचण सांगितली. परंतु लॉकडाऊन असल्याने विेवेक यांचे कुटुंब अहमदाबाद येथून येऊ शकत नव्हते. तसेच लॉकडाऊनमुळे कोर्ट मॅरेज देखील होणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबासमोरील अडचणी वाढत होत्या. अखेर विवेकने देखील विचार केला की तो किती दिवस सासरी राहणार. अशा परिस्थिती विचित्र बनली होती. शेवटी दोन्ही कुटुंबानी एकमेकांच्या सहमतीने विवेक आणि पूजाचा सोमवारी लग्न लावून दिले.

व्हिडिओ कॉलिंगद्वारे घेतले सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद
सासरवाडीत 30 दिवस राहिलेला विवेक लग्नाच्या बेडीत अडकला. मात्र, विवेकचे आई-वडील भाऊ व बहिण लग्नाला येऊ शकले नाहीत. हा विवाह सोहळा वधूच्या कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, विवेकने आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला आपल्या लग्न सोहळ्यात सहभागी करून घेतले. विवेकने व्हिडिओ कॉलकरून आपला लग्न सोहळा दाखवला. तसेच व्हिडिओ कॉलद्वारेच पूजाने सासू सासऱ्यांचे आशीर्वादही घेतले.