Coronavirus : ‘ही’ भारतीय कंपनी जगभरातील तब्बल 127 देशांना पाठवणार ‘कोरोना’चं औषध, अमेरिकेच्या कंपनीशी झाला करार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना संसर्गामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. तर जगात ४२ लाख लोकांना त्याचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत ३ लाखांच्या आसपास लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळं झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी त्यावर प्रभावी लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देशांमध्ये सुरु आहे.

भारतातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी जुबिलंट लाईफ सायन्स जगभरातील १२७ देशांना कोरोना संसर्गावर प्रभावी असणार रेमडेसिवीर औषध विकणार आहे. यासाठी जुबिलंट लाईफ सायन्सने गिलियड या अमेरिकेतील कंपनीशी करार केला असून, हा करार भारत आणि इतर १२७ देशांसाठी आहे. तसंच गिलियडने रेमडेसिवीर बनविणाऱ्या तीन भारतीय कंपन्यासोबत करार केला आहे. या तीन कंपन्यांमध्ये ज्युबिलंट लाइफ सायन्स, हेटरो आणि सिप्ला या आहेत.

ज्युबिलंट लाइफ सायन्स १२७ देशात औषधांची विक्री करणार आहे. गिलियडच्या मतानुसार, रेमडेसिवीर बनविण्याच्या प्रकियेचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा कंपन्यांना अधिकार आहे. हे उत्पादन वाढविण्यास मदत करते. जेनेरिक औषधे तयार करण्यास परवाना आणि कंपनीला त्याची किंमत ठरविण्याचा अधिकार असणार आहे. याबाबत, जुबिलंट लाइफ सायन्सचे अध्यक्ष श्याम भारतीया म्हणाले की, आम्ही क्लिनिकल चाचणी व औषधाची नियामक मान्यता देखरेख ठेवू आणि मंजुरीनंतर औषध उत्पादनला सुरुवात केली जाईल. आमची योजना देशात औषधांचा एपीआय तयार करण्याची आहे. त्यामुळे रेमडेसिवीरची किंमत कमी होण्यास मदत होईल.

कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. तिथे आतापर्यंत कोरोना संसर्गाचे १४ लाखांच्यावरती रुग्ण असून, जवळपास ८३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ७० हजारांच्या पुढं गेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेमडेसिवीरला कोरोना संसर्गित रुग्णांवरती उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर जगभरात कोरोना संसर्गावरती लस शोधण्यासाठी १५० च्या वरती प्रकल्प सुरु आहेत.