Coronavirus : ‘होम क्वारंटाइन’ असलेल्या IAS अधिकाऱ्याने घरातून काढला पळ, थेट गाठले दुसरे राज्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. सर्वाना घरातच राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. दरम्यान, केरळमध्ये होम क्वारंटाइन असलेल्या आयएएस अधिकाऱ्याने घरातूनच पळ काढला असल्याचं समोर आलं आहे. १८ मार्चपासून होम क्वारंटाइमध्ये असणाऱ्या या अधिकाऱ्याने सरकारी निवासस्थानावरून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपलं गाव गाठलं आहे. याप्रकरणी कोल्लम येथील उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाईदेखील केली जाणार आहे.

उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा हे सुट्टीवरुन आल्यानंतर १८ मार्च रोजी ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. मिश्रा परदेशातून प्रवास करुन आले होते, त्यामुळे जिल्हाधिकारी अब्दुल नजीर यांनी त्यांना सरकारी निवासस्थानी विलगीकरणात राहण्याचा आदेश दिला होता. विलगीकरणात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून रोज पाहणी केली जाते. यावेळी अनुपम मिश्रा हे घऱात नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी तपास केला असता अनुपम मिश्रा कोणालाही न सांगता उत्तर प्रदेशात त्यांच्या गावी गेल्याचे समोर आलं. दरम्यान,या अत्यंत गंभीर विषयाबाबत सरकारकडे अहवाल सोपवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, केरळमधील अधिकारी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. लॉकडाउन दरम्यानही त्यांनी राज्याबाहेर प्रवास कसा केला ? याचा तपास केला जात आहे. दरम्यान अनुपम मिश्रा यांच्या संपर्कात आल्याने त्यांचे सुरक्षारक्षक आणि इतरांनादेखील विलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं असल्याचं समजते.