तलप जीवावर बेतली ! दारु समजून ‘सॅनिटायझर’ प्यायल्याने कैद्याचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कैद्याने दारु समजून सॅनिटायझरचे सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना केरळमधील पल्लकड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये घडली आहे. यासंदर्भात तुरुंग प्रशासनातील अधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे. रामणकुट्टी असे मृत कैद्याचे नाव आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. असे असतानाही केरळमध्ये दारु न मिळाल्याने सहाजणांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. दुसरीकडे तुरुंगामध्ये असलेले सॅनिटायझर दारु असल्याचे समजून प्यायल्याने कैदी चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळ राज्य सरकारने तुरुंगामधील कैद्यांकडून सॅनिटायझर आणि मास्क बनवून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याचाच भाग म्हणून पल्लीकडमधील तुरुंगामध्ये सॅनिटायझर बनवले जात होते. मात्र अल्कोहोल वापरले जात असल्याने दारु समजून सॅनिटायझर प्यायल्याची विचित्र घटना घडली. त्यानंतर कैदी दुसर्‍या दिवशी त्याने सकाळच्या हजरेसाठी उपस्थिती लावली. मात्र साडेदहाच्या सुमारास रामणकुट्टी चक्कर येऊन पडला. त्यानंतर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.