Coronavirus : ‘कोरोना’मुळं अमेरिकेत आतापर्यंत 88000 जणांचा मृत्यू, एकटया न्यूयॉर्कमध्ये 3 लाख रूग्ण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू या जागतिक साथीमुळे अमेरिकेत 88 हजाराहून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत या साथीने हाहाकार माजवला असून आतापर्यंत सुमारे 14 लाख पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र (सीएसएसई) ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 88 हजारांच्या पुढे जाऊन 88,675 झाली आहे, तर संक्रमित लोकांची संख्या 14 लाखांच्या पुढे जात 14,65,066 झाली आहे. तसेच अमेरिकेत अडीच लाखापेक्षा अधिक लोक पूर्णपणे कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी प्रांतात कोरोनाने सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. केवळ न्यूयॉर्कमध्येच कोरोना संसर्गाच्या 3 लाखापेक्षा अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे, तर 28 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत न्यू जर्सीमध्ये कोरोना संसर्गाची एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत तर या साथीमुळे 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त मॅसेच्युसेट्स, मिशिगन, इलिनॉय, कॅलिफोर्निया, लुईझियाना आणि पेनसिल्व्हानिया या प्रांतांमध्येही कोविड -19 चा उद्रेक पहायला मिळत आहे. या सर्व प्रांतात कोरोनामुळे दोन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.