Coronavirus : जिगरबाज ! रुग्णांच्या सेवेसाठी ‘ती’ स्कुटीवरुन MP मधून महाराष्ट्रात पोहचली

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, पोलिस, नर्स सर्वच योद्धांची कहानी प्रत्येकांच्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. असंच एक प्रेरणादायी उदाहरण … मध्य प्रदेशातील बालाघाट येथे राहणाऱ्या प्रज्ञा घरडे नावाची मुलगी व्यवसायाने डॉक्टर आहे. नागपूरच्या खासगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये प्रज्ञा सेवा बजावते. डॉ. प्रज्ञा सुट्टीला तिच्या घरी आली होती. मात्र अचानक संक्रमण वाढत असल्याने त्यांना सुट्टीवरून पुन्हा आरोग्य सेवा बजावण्यासाठी कामावर परतावे लागले.

लॉकडाऊनमध्ये बस आणि ट्रेनची सुविधा स्थगित करण्यात आली आहे. परिणामी, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी या महिला डॉक्टरने थेट स्कूटीवरून नागपूरपर्यंत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला इतक्या लांबचा प्रवास स्कूटीनं करण्याची परवानगी देण्यासाठी तिचे घरचे तयार नव्हते. परंतु डॉ. प्रज्ञाने सेवा भावनेतून तिच्या घरच्यांची समजूत काढली आणि सहमती घेतली. प्रज्ञा सोमवारी सकाळी स्कूटीवरून नागपूरसाठी रवाना झाली आणि दुपारी नागपूरात पोहचून पुन्हा कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर झाली.

बालाघाट ते नागपूर हे अंतर १८० किमी आहे. स्कूटीवरून हे अंतर पार करण्यासाठी डॉ. प्रज्ञाला ७ तासांचा अवधी लागला. रखरखत्या उन्हात सामानसह स्कूटी चालवणं खूप अवघड गेले. रस्त्यात कुठेही खाण्याचं पिण्याच्या वस्तूही उपलब्ध झाल्या नाहीत. पण ज्यावेळी नागपूरात पोहचले तिथून पुन्हा मी कामावर रुजू झाले यातच मला मानसिक समाधान मिळालं असं प्रज्ञाने सांगितले.

दरम्यान, बालाघाटच्या डॉ. प्रज्ञाने सांगितले की, ती नागपूर येथे ६ तास कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करते. त्याशिवाय पालीमधील एका हॉस्पिटलमध्येही ती कार्यरत आहे. ज्यामुळे दिवसातील जवळपास १२ तास तिला पीपीई किट्स घालून काम करावं लागतं. सुट्टी घेऊन मी घरी आले होते. याच दरम्यान कडक निर्बंधामुळे मला नागपूरला परतण्यसाठी कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे अशातच तिने स्कूटीवरून नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला.