Coronavirus : ‘कोरोना’च्या धसक्यामुळं लालूप्रसाद यादवांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रांचीतील रिम्स रुग्णालयात (राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रसार होण्याआधीच लालूप्रसाद यादव यांनी कोरोनाचा धसका घेतल्याचे असमजते आहे.

दरम्यान, याच रुग्णालयात चौथ्या मजल्यावर कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी विशेष वॉर्ड बनविण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. या संदर्भात माहिती मिळताच लालूप्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विवेक कश्यप यांच्याकडे लालू यांनी नाराजी बोलून दाखवली. अखेर लालू यांच्या विरोधामुळे रुग्णालय प्रशासनाने इमारतीमध्ये कोरोना आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय मागे घेतला. यासंदर्भात रिम्सच्या अधीक्षकांकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, रिम्समध्ये मागील दोन दिवसांत कोरोनाच्या संसर्गाच्या संशयावरून तीन रुग्ण तपासणीसाठी आले होते. त्यातील दोघांची तपासणी करून सोडण्यात आलं, मात्र एकाला उपचारासाठी भरती करुन घेण्यात आलं. ज्याच्यावर डॉ. विद्यापती युनिटमध्ये उपचार सुरु आहे. चौथ्या मजल्यावर कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याच्या उद्देशाने रुग्णालयाच्या प्रशासनाने या जागेची पहाणी केली, डॉक्टर कश्यपदेखील याठिकाणी पोहोचले. या रुग्णाला दुसऱ्या वॉर्डमध्ये चौथ्या मजल्यावर शिफ्ट करण्याचा रुग्णालयाचा विचार होता. लालूप्रसाद यांना हे समजताच त्यांनी आपली नाराजी प्रशासनाकडे व्यक्त केली. त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.

उपचारासाठी भरती असलेले लालू प्रसाद सामान्यपणे सकाळी रुग्णालयामधील लॉबीमध्ये चालण्यासाठी बाहेर पडतात. त्यानंतर काही तास ते जवळच असणाऱ्या कॉटेज नंबर १४ मध्ये उन्हात बसून असतात. मात्र करोनाचा संक्षयित रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांनी आपल्या रुमच्या बाहेर न पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून ते आपल्या रुममधून बाहेर पडलेले नाहीत. आज (शनिवारी) लालू यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती रुग्णालयात आले असता या दोघींची आपल्या रुमबाहेर म्हणजेच कॉटेज नंबर १४ मध्येच भेट घेतली.