Coronavirus : देशात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात 3.86 लाख नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात देशभरात ३ लाख ५६ हजार ४१३ नवीन रुग्ण आढळले होते. त्यापेक्षा अधिक नवीन रुग्ण सध्या एका दिवसात सापडत आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात एकूण ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.

जगभरात कोरोनाचा दुसर्‍या, तिसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात बहुतांश देशांना यश आले असताना भारतात मात्र कोरोनाची सुनामी आली आहे. जगातील सर्वाधिक नवीन कोरोना बाधित भारतात सापडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोना बाधित सापडत आहेत.

अमेरिकेत डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. त्यावेळीही इतके रुग्ण आढळत नव्हते. अमेरिकेत ८ जानेवारी ३ लाख ७ हजार ५१६ इतके सर्वाधिक नवीन रुग्ण एका दिवसात आढळून आले होते. संपूर्ण डिसेंबर २०२० मध्ये अमेरिकेत ६५ लाख ६७ हजार १५८ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर जानेवारी २०२१ मध्ये ६१ लाख ९१ हजार ७०५ नवीन रुग्ण आढळून आले होते. डिसेंबर महिन्यात सरासरी २ लाख ११ हजार ८४३ नवीन रुग्ण दररोज आढळून आले.

या उलट भारतात डिसेंबर महिन्यात ८ लाख ३ हजार ६९९ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारी महिन्यात ४ लाख ६३ हजार ७९७ नवीन रुग्ण आढळून आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कोरोना प्रादुर्भाव अजूनच कमी झाला आणि संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात ३ लाख ५६ हजार ४१३ नवीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनावर मात केल्याची घोषणाबाजी करुन सत्ताधारी स्वत:चे कौतुक करण्यात मग्न झाली. त्यात ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, या तज्ञांच्या इशार्‍याकडे सर्वांनीच दुर्लक्ष करत सोहळे सुरु केले.

त्यानंतर मार्च महिन्यांच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. संपूर्ण मार्च महिन्यात ११ लाख ७८ हजार ४९१ नवीन रुग्ण आढळून आले. तेव्हा शासकीय यंत्रणा काहीशी जागी होऊ लागली. तोपर्यंत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशातील १५ राज्यांमध्ये आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली होती. १ ते २९ एप्रिल या काळात देशभरात तब्बल ६४ लाख ५२ हजार ८७४ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. ही जगातील एका महिन्यात आढळून आलेली सर्वाधिक संख्या आहे.

अमेरिकेत कोरोनाची लाट प्रभावी होती, तेव्हाही दररोज सरासरी २ लाख ११ हजार ८४३ नवीन रुग्ण आढळत होते. सध्या भारतात एप्रिल महिन्यात दररोज सरासरी २ लाख २२ हजार ५१२ नवीन रुग्ण आढळून येत आहेत.