भारतात तयार झालेल्या ‘वॅक्सीन’चा असा होतोय परिणाम, Covaxin च्या मानवी परीक्षणाबाबत महत्वाची माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूके, यूएसमधील कोरोना लशीच्या मानवी चाचणीनंतर आता भारतातील लसीच्या मानवी चाचणीचीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतात कोवॅक्सिन या लशीचं ह्युमन ट्रायल सुरु झालं आहे. ह्युमन ट्रायलमध्ये ही लस सुरुवातीला सकारात्मक परिणाम देत असल्याचं दिसून आलं आहे. हरयाणाच्या पीजीआय रोहतक या वैद्यकीय संस्थेमध्ये ज्या व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे त्यांच्यावर लसीचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही.

हैदराबाद भारत बायोटेक कंपनीने ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च आणि पुण्यातील इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर या लसीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO करुन परवानगी मिळाली आणि ह्युमन ट्रायल सुरु झालं आहे. देशातल्या विविध राज्यांमधल्या 12 हॉस्पिटलमध्ये या लसीची चाचणी केली जात आहे. त्यामध्ये पीजीआय रोहतक वैद्यकीय संस्थेचा समावेश आहे. या ठिकाणी तीन जणांना लस देण्यात आली आहे.

हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी सांगितले की, पीजीआय रोहतमध्य आज कोरोना लस कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरु करण्यात आली. तीन जणांना आज ही लस देण्यात आली आहे. लसीचा त्यांच्यावर दुष्परिणाम झाला नाही.

निरोगी लोकांना ही लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असून त्याचे सर्व रिपोर्ट्स आयसीएमआरला पाठवले जाणार आहेत. लवकरच या प्रयोगाला सुरुवात होणार असून त्यासाठी स्वेच्छेने आलेल्या 200 आरोग्य स्वसंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या लसीला BBV152 COVID Vaccine असे नाव देण्यात आले आहे.