Mask Bank : ‘या’ शहरात मिळणार मोफत मास्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत संक्रमण पोहोचू नये, यासाठी मास्कचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मध्य दिल्लीतील सदर बझार भागात मास्क बँक स्थापन केली असून, उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश यांच्या हस्ते नुकतेच या बँकेचे उद्घाटन करण्यात आले.

एका निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस आणि उत्तर दिल्ली महापालिका यांच्या सहकार्याने बारह तुती चौकात ही मास्क बँक स्थापन केली आहे. ज्यांना कोणाला मास्कची गरज आहे, त्यांना या बँकेतून मोफत मास्क मिळणार आहे. तसेच ज्यांना मास्क दान करायचे आहेत, तेही इथे आणून देऊ शकतात. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यात गरीब कामगार, व्यावसायिक, ग्राहक यांचा समावेश असतो. मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आहे. गरीब कामगारांना इतका दंड भरणे परवडणारे नाही. त्यामुळे मोफत मास्क पुरवण्याच्या उद्देशाने ही मास्क बँक स्थापन केल्याचे प्रकाश यांनी म्हटले आहे.

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिव वाढत आहे. त्यात मृत्यू दरही अधिक आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांचे प्रमाण 8.49 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याबाबतचे नियम अधिक कठोर केले असून, दंडाची रक्कमही वाढवली आहे. लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवणे हा आमचा उद्देश आहे. उत्तर दिल्लीतील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 104 मास्क बँका स्थापन करण्याची आमची योजना आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.