Coronavirus : ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासात 64531 प्रकरणे, 1092 मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २.२१ कोटीहून अधिक लोक महामारीने संक्रमित झाले आहेत, तर ७.९ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त अमेरिका, ब्राझील आणि भारतात परिणाम झाला आहे.

आतापर्यंत भारतात संक्रमितांची एकूण संख्या २७,६७,२७३ वर पोहोचली आहे. या व्यतिरिक्त या महामारीमुळे ५२,८८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातून बरे होणार्‍या लोकांची संख्या २०,३७,८७० वर पोहोचली आहे हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नुसार, १८ ऑगस्टपर्यंत कोरोना विषाणूचे एकूण ३,१७,४२,७८२ नमुने घेण्यात आले असून त्यापैकी ८,०१,५१८ नमुन्यांची चाचणी काल घेण्यात आली.

भारताव्यतिरिक्त अमेरिकेत ५,४८१,५५७ लोक आणि ब्राझीलमध्ये ३,४०७,३५४ लोक या महामारीने संक्रमित आहेत. अमेरिकेत १.७१ लाख लोक मारले गेले आहेत आणि ब्राझीलमधील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या १ लाखांवर गेली आहे.

गोव्यात २ आमदारांना कोरोनाची लागण
गोव्यात दोन आमदारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यातील एक आमदार माजी मंत्री आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री सुदिन धवलीकर आणि भाजपचे आमदार नीलकांत हलार्नकर यांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.

महाराष्ट्रात ११,११९ नवीन प्रकरणे, ४४२ मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची ११,११९ नवीन प्रकरणे आढळल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या ६,१५,४७७ वर पोचली आहे. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोविड-१९ च्या ४२२ रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून २०,६८७ वर गेली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, ९,३५६ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर बरे झालेल्या एकूण लोकांची संख्या ४,३७,८७० झाली आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात अजूनही १,५६,६०८ लोक या विषाणूने संक्रमित आहेत.

हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचारी, ड्रायवरसह ६१ लोक संक्रमित
मंगळवारी हिमाचल प्रदेशात कोविड-१९ चे ६१ नवीन रुग्ण आढळले, ज्यात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे १२ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालक आणि भाजपचे एक आमदार यांचा समावेश आहे. यासह राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या ४,२३६ वर गेली आणि मृतांची संख्या १८ वर पोचली.

मंगळवारी सोलनचे आमदार परमजीत सिंह पम्मी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. प्रशासनाने सांगितले की, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे १२ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालक कोरोना संक्रमित आहेत. आतापर्यंत राज्यात २,९२३ लोक बरे झाले आहेत आणि १,२५३ लोकांवर उपचार सुरू आहेत.

बंगालमध्ये ३,१७४ नवीन प्रकरणे, ५५ मृत्यू
मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये कोविड-१९ ची ३,१७५ नवीन प्रकरणे आढळली. ही राज्यातील कोणत्याही एका दिवसाची सर्वोच्च पातळी आहे. राज्यात संक्रमित लोकांची संख्या वाढून १,२२,७५३ झाली.

राज्यात या आजारामुळे आणखी ५५ रूग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढून २,५२८ झाली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत २,९८७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यात रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.५१ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. राज्यात सध्या २७,५३५ संक्रमित आहेत.

दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांनी डोनेट केला प्लाझ्मा
दिल्लीत ड्यूटी दरम्यान कोरोना विषाणूची लागण झालेले पोलिस कर्मचारी बरे होऊन इतर लोकांचा जीव वाचवण्यासाठी पुढे येत आहेत. मंगळवारी सुमारे १५० पोलिसांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी एलएनजेपी रुग्णालयात नोंदणी केली. हे सर्व पोलिस कर्मचारी पुन्हा ड्युटीवर परतले आहेत, यात महिला पोलिस कर्मचारीही आहेत. जुलै महिन्यात एलएनजेपी रुग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू केली होती. यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केला गेला आहे.

युपी विधानसभेचे २० कर्मचारी संक्रमित
उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लखनऊमध्ये कॅम्प लावून सर्व आमदारांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. यापूर्वी विधानसभा कर्मचार्‍यांचीही चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये २० कर्मचारी संक्रमित असल्याचे आढळले. उद्यापासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात कोरोनामुळे बरेच नवीन नियम बनवण्यात आले आहेत. विधानसभा कॅन्टीनमध्ये जेवणासाठी फक्त १० लोक एकत्र बसू शकतील. प्रेक्षक गॅलरीत पत्रकारांसह बाहेरील लोकांना पास मिळणार नाही. मीडिया कव्हरेजसाठीही मर्यादित पास दिले जातील.

पुण्यातील सर्वेक्षणामुळे उडाली खळबळ
पुण्यातील सिरो सर्वेक्षणात धक्कादायक निकाल आला आहे. या सर्वेक्षणानुसार पुण्यातील सर्वाधिक संक्रमित भागात ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडीज आढळल्या आहेत, म्हणजेच या सर्व लोकांना कधी-ना-कधी कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या ४ संशोधन संस्थांनी सुमारे १६०० लोकांच्या रक्त नमुन्यांच्या तपासणीतून हे निकाल काढले आहेत. मात्र एजन्सींचे म्हणणे आहे की, या सर्वेक्षणाचा अर्थ असा नाही की ज्याच्या शरीरात कोरोनासाठी अँटीबॉडी तयार झाली आहे, असे लोक आता कोरोनापासून १०० टक्के सुरक्षित आहेत.

बोट बनली रुग्णवाहिका
केरळमध्ये महापुरातही कोरोनाचे युद्ध पूर्ण ताकदीने लढले जात आहे. पूर दरम्यान बचाव आणि रेस्क्यूसाठी बसवलेल्या बोटी प्रशासनाच्यावतीने वॉटर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बदलण्यात आल्या आहेत. वास्तविक अनेक दुर्गम भागांचा अजूनही शहरे आणि मुख्यालयातून संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना रूग्णालय आणि आयसोलेशन केंद्रात आणण्यात या बोटींची खूप मदत होत आहे.

तरुणांमध्येही अधिक संसर्ग- डब्ल्यूएचओ
डब्ल्यूएचओने पत्रकार परिषदेत कोरोना विषाणूबद्दल नवीन माहिती दिली आहे. यानुसार २० ते ४० वर्षे वयोगटातील बर्‍याच लोकांना संसर्ग होत आहे, त्यातील काही जणांना संसर्ग झाल्याचे देखील माहित नाही. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया येथून कोरोनाबद्दल एक चांगली बातमी आहे, गेल्या २४ तासांत व्हिक्टोरियामध्ये कोरोना विषाणूची केवळ २२२ प्रकरणे आढळली आहेत, तर १७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ही या महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे.