Coronavirus in India : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर ! भारतात मोडले सर्व ‘विक्रम’ , एकाच दिवसात 4.12 लाख नवीन केस, 4 हजार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था- कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने भारतात कहर माजवला आहे. मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या थोड्या घसरणीनंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन प्रकरणांनी उसळी घेतली आहे. भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने आतापर्यंतचे सर्व विक्रम तोडले आहेत. आणि एका दिवसात बुधवारी 4.12 लाखांपेक्षा जास्त केस आणि 4000 मृत्यू झाले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून एका दिवसात सापडलेल्या कोरोना केस आणि मृत्यूंची ही सर्वाधिक संख्या आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात बुधवारी 24 तासात कोरोना व्हायरसची 412,618 नवी प्रकरणे समोर आली. तर एका दिवसात कोविड-19 मुळे विक्रमी 3982 लोकांच्या मृत्यूनंतर या आजाराने मरण पावलेल्यांची एकुण संख्या 2,30,010 पेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या नवीन प्रकरणानंतर कोविड-19 ची एकुण प्रकरणे वाढून 2,10,64,862 झाली आहेत. यापूर्वी 30 एप्रिलला एका दिवसात चार लाखापेक्षा जास्त कोरोना केस आल्या होत्या.

मे महिन्यात अशाप्रकारे विक्राळ होत चाललाय कोरोना…
* 5 मे 2021 : 412,618 नवीन केस आणि 3,982 मृत्यू
* 4 मे 2021 : 382,691 नवीन केस आणि 3,786 मृत्यू
* 3 मे 2021 : 355,828 नवीन केस आणि 3,438 मृत्यू
* 2 मे 2021 : 370,059 नवीन केस आणि 3,422 मृत्यू
* 1 मे 2021 : 392,562 नवीन केस आणि 3,688 मृत्यू

सातत्याने वाढत चाललेल्या प्रकरणानंतर देशात उपचाराधीन रूग्णांची संख्या 35,62,746 झाली आहे, जी संसर्गाच्या एकुण प्रकरणांच्या 16.87 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.03 टक्के नोंदला गेला आहे. आजारातून बरे होणार्‍या लोकांची एकुण संख्या 1,72,63,196 झाली आहे. तर मृत्यूदर कमी होऊन 1.09 टक्के झाला आहे. आयसीएमआरनुसार 1 मेपर्यंत 29,48,52,078 नमून्यांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी 15,41,299 नमून्यांची मंगळवारी तपासणी करण्यात आली.

10 राज्यात कोरोनाची सुमारे 71 टक्के नवीन प्रकरणे
देशात मागील 24 तासादरम्यान सुमारे 71 टक्के प्रकरणे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 10 राज्यांतून आली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. नवीन प्रकरणांमध्ये 70.91 टक्के प्रकरणे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, हरियाणा, पश्चिम बंगाल, तमिळनाडु, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधून समोर आली आहेत. या दरम्यान, महाराष्ट्रातून सर्वाधिक 51,880 नवीन प्रकरणे समोर आली, तर कर्नाटकमध्ये 44,631 आणि केरळात कोरोना व्हायरस संसर्गाची 37,190 नवीन प्रकरणे सापडली आहेत.