Coronavirus : जाणून घ्या घरबसल्या कसा घ्यायचा अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांचा मोफत सल्ला; अमेरिकेत सध्या भारतीय वंशाचे 50 हजार डॉक्टर, अनेक तज्ज्ञांशी मराठीतून साधता येणार ‘संवाद’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोना विषाणू कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढत आहे. जर तुम्हाला देखील कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्ही अमेरिकेतील भारतीय वंशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला घेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे एक स्मार्ट फोन आणि इंटरनेट असणे आवश्यक आहे.

मागील वर्षापासून कोरोना व्हायरसने देशात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय विभाग अहोरात्र काम करत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी डॉक्टर रुग्णांसाठी अहोरात्र झटत आहे. आता देशीतील डॉक्टरांना अमेरिकेतील डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी सुरु केलेल्या या उपक्रमात भारतीय वंशाचे तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉक्टर हेमराज गायधनी यांनी सांगितले की, कोरोना हे जागतिक संकट असून याचा भारताला मोठा फटका बसला आहे. भारतातील लोकसंख्या सर्वाधिक असल्याने हे कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणणे सर्वात मोठे आव्हान समोर आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांना योग्य सल्ला देण्यासाठी भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी एक व्यासपीठ तयार केले आहे. याठिकाणी कोरोना बाधित रुग्णाला मोफत योग्य सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांना त्यांच्या भाषेत हा सल्ला दिला जाणार असून कोरोनावरील नेमक्या उपचारांची माहिती दिली जाणार आहे. अमेरिकेत सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये, डॉ. अभिजित नाकवे, डॉ. हेमराज गायधनी, डॉ. निशांत सांगोळे, डॉ. गुप्ता, डॉ. नितीन ठाकरे या तज्ज्ञ डॉक्टरांनी पुढाकार घेतला असून यामध्ये त्यांचा मित्र परिवार देखील सहभागी झाला आहे.

कसा साधायचा संवाद?

कोरोना बाधित रुग्णाला अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी www.mdtok.com/org/covid19 हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या रुग्णांना घरातून किंवा रुग्णालयातून अमेरिकेतील डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे. शिवाय त्यांचे मेडिकल रिपोर्ट देखील डॉक्टरांना दाखवता येणार आहेत. रिपोर्टनुसार डॉक्टर रुग्णाला सल्ला देणार आहेत. ही सुविधा मोफत असून कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

मराठीत साधणार संवाद

अमेरिकेत सध्या भारतीय वंशाचे 50 हजार डॉक्टर आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातील हे डॉक्टर आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये यातील काही डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मराठी भाषेत संवाद साधणारे डॉक्टर देखील या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. हे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांशी मराठीतून संवाद साधणार असून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला देणार आहेत.