Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 167 वर, सापडले 8 नवे रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. मात्र, याचा परिणाम होताना दिसून येत नाही. राज्यातील काही भागात अद्यापही नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा संख्या 167 वर पोहचल्याने चिंतेचे वातावरण असून नागरिकांनी घरात बसण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून राज्यात 8 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे नवे 7 रुग्ण आढळून आले असून नागपूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. राज्यात एकूण 8 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 167 वर पोहचली आहे. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये 4 महिला आणि 3 पुरुष दाखल झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत.

शुक्रवारी दिवसभरात 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान देशभरात कोरोनाचा धोका वाढत असून आतापर्यंत 834 जणांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. देशात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 75 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. मागील दोन महिन्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांची देखरेख करण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मागील दोन महिन्यात तब्बल 15 लाख प्रवासी परदेशातून भारतात आले आहेत.