Coronavirus : ‘या’ कारणामुळं पुढचे 3 आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे, काळजी घ्या; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

पोलीसनामा ऑनलाइनः देशात कोरोनाने थैमान घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज 2 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. देशात दुसऱ्या लाटेचा कहर दिसून येत आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. देशभरात रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा पार केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी विविध मत व्यक्त केली आहेत. सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे 3 आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.

डॉ. मिश्रा ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, पुढचे 3 आठवडे कोरोनाचे नियम सक्तीने पाळावे लागतील. नाहीतर इटलीची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे. इटलीत ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. देशात दुसऱ्या लाटेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने वाढत असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. लोकांनी घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे सोडले आहे. त्यामुळे देखील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे मुख्य कारण आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लस हे सर्वात मोठ शस्त्र आहे. मात्र तरीही लोकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच प्रकरणांमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना हा व्हायरस हवेतून पसरतो. त्यामुळे मास्क लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून 80 ते 90 टक्के वाचवू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाच्या दैनंदिन संक्रमणाचा दर गेल्या 12 दिवसांत दुप्पट होऊन 16.69 टक्के झाला आहे. आठवड्याचा संक्रमणाचा दर 13.54 टक्क्यांवर पोहोचला गेला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये या 10 राज्यांत 78.56 टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक आठवड्याचा संक्रमण दर 30.38 टक्के आहे. त्यानंतर गोवा 24.24 टक्के, महाराष्ट्र 24.17 टक्के आहे. कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.