Coronavirus Impact : मुंबईच्या हजारो लोकांना मिळणार नाही जेवण ! डब्बेवाल्यांनी बंद केली ‘सेवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे भारतात दहशत निर्माण झाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्य सरकारने देखील खबरदारी म्हणून सर्वांना काळजी घेण्यास सांगितले आहे. अनेक कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. यानंतर आता मुंबईतील डबेवाले देखील आपली सेवा काही दिवसांसाठी बंद करणार आहेत.

मुंबईच्या डब्बेवाल्यांची संघटना अत्यंत मोठी आहे. ते अनेक मुंबईकरांना त्यांच्या घरापासून कार्यालयापर्यंत जेवण पोहोचवतात. परंतु आता कोरोनामुळे ही सेवा काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोनापासून खबरदारी म्हणून मुंबईत हाजीआली दरगाह बंद करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पंतप्रधानांशी बोललो, त्यांनी केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्याचे वचन दिले आहे. आम्ही कोरोना व्हायरसच्या विरोधात युद्ध लढत आहोत. आपल्या सर्वांना खबरदारी म्हणून पावले उचलावी लागतील. अनावश्यक प्रवास टाळा. स्थिती गंभीर नाही परंतु चिंताजनक आहे.”

मेघालय सरकारने कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटन स्थळे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी संभावना आहे की ही बंदी 15 एप्रिलपर्यंत वाढवली जाऊ शकते.