कारगिल युद्धातील जवानाचा आक्रोश, म्हणाला – ‘मी आयुष्यभर मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. कारगिल युध्दातील एका जवानाला कोरोनामुळे आपला 34 वर्षीय मुलगा गमवावा लागला आहे. मी आयुष्यभर देशसेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही, असा आक्रोश त्या जवानाने केला आहे.

सुभेदार मेजर (निवृत्त) हरी राम दुबे यांच्या 34 वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. मी 1981 ते 2011 पर्यंत आपल्या मातृभूमीची सेवा केली. कारगिल ते बारामुल्ला, लडाख ते लुकुंग येथे मी कर्तव्य बजावले आहे. मी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना ठार केल आणि कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधात लढा दिला. पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही. मंगळवारी संध्याकाळी त्याचे निधन झाल्याचे दुबे यांनी म्हटले आहे. मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी दुबे यांना आपली पत्नी, मुलगी आणि सुनेसोबत कित्येक तास वाट पहावी लागली. नंतर अखेर कुटुंबाला पीपीई किट घालून मृतदेह पाहण्याची परवानगी दिली. मी केलेल्या कामाबद्दल लष्कर प्रमुखांकडून प्रमाणपत्र देऊन माझा गौरव झाला होता. मी कारगिल युद्धात सहभागी होतो. मी दहशतवाद्यांशी लढलो, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही आणि आता कागदपत्रांसाठी पळवत आहेत. ही वागणूक म्हणजे छळ असल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.