धक्कादायक ! खासदारांच्या मृत्यूनंतर कोरोनाने दोन्ही मुलांचा बळी घेतला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक सेलिब्रिटींना, नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली असून काहींचा मृत्यू झाला आहे. अशातच राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या दोन मुलांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ एक कुटुंबातील 3 सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मोहपात्रा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

ओडिशा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा (वय 47) यांचे कोरोनाने स्थानिक एम्स रुग्णालयात बुधवारी निधन झाले. 1990 मध्ये रणजी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या प्रशांत यांनी 45 प्रथमश्रेणी सामने खेळले. निवृत्तीनंतर बीसीसीआयने त्याची मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती केली होती. प्रशांत यांचे मोठे बंधू आणि रघुनाथ मोहपात्रा याचे पुत्र जशवंत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अधिक बिघडल्याने एम्समधून त्यांना एसयूएम कोविड रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.