Coronavirus : मध्यप्रदेशात ‘कोरोना’ची तपासणी करणार्‍या डॉक्टरांवर चक्क ‘दगडफेक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाची तपासणी सुरु असताना आरोग्य विभागाच्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोग्य विभागाच्या पथकावर थेट दगडफेक केली. इंदूरच्या टाट पट्टी बाखल भागात काल दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने आरोग्य विभागाचे पथक थोडक्यात या दगडफेकीतून बचावले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. दगडफेकीच्या या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

टाट पट्टी बाखल भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने हा भाग कोरनाच्या फैलावाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केला आहे. इथे राहणार्‍या 54 कुटुंबांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. स्थानिकांची तपासणी करण्यासाठी दोन डॉक्टरांना पाठवण्यात आले होते. काही रहिवाशांनी या आरोग्य पथकाला शिवीगाळ व दगडफेके केली. त्यामुळे त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला अशी माहिती डीआयजी हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. कोणीही जखमी झालेले नाही. दगडफेक करणारे कोण होते ? त्यांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. कलम 353 अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल अशी माहिती हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. जवळपासच्या तीन पोलीस ठाण्यातील पथके आता तिथे तैनात करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.