Coronavirus Lockdown : ‘अफवा’ उडाल्या की सरकार वाटतंय ‘फ्री’ रेशन अन् 1000 रूपये, लॉकडाऊन तोडून लोकांनी लावल्या ‘रांगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून अनेक अफवांना उधाण आले आहे. कधी सोशल मीडियावर तर कधी मोबाईलवर मेसेजेस आल्यामुळे रोज नवीन अफवा उडत असतात. यास सामोरे जाणे प्रशासनासाठी मोठे आव्हान बनले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये गुरुवारी सकाळी लोकांच्या फोनवर एक मेसेज आला, ज्यामध्ये असे लिहिले गेले होते की सरकारने दिलेल्या रेशन आणि आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला काही आवश्यक कागदपत्रांसह नगरपालिका कार्यालयात जावे लागेल. त्यानंतर ६००-७०० लोक लॉकडाउन असतानाही महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहोचले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब कुटुंबांना १००० रुपये आणि मोफत रेशन दिले जाईल अशी घोषणा केली होती. जिल्हा प्रशासनाने अशा मजुरांचा डेटा गोळा करण्यास सुरवात केली, ज्यांच्या बँक खात्यात ही रक्कम दिली जाईल. बुधवारी अलिगडचे डीएम चंद्रभूषण सिंग यांनी नगरसेवकांशी बैठक घेऊन त्यासंबंधित नोंदी गोळा करण्यास सांगितले. परंतु आज सकाळपासूनच डीएम कार्यालयाबाहेर आणि महानगरपालिका कार्यालयाबाहेर महिला व पुरुष मोठ्या संख्येने जमा होऊ लागले.

लोकांनी सांगितले की आम्हाला महानगरपालिकेच्या कार्यालयात १००० रुपये आणि रेशन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच आम्ही येथे जमलो आहोत. लोक बराच काळ कॉर्पोरेशन कार्यालयाबाहेर उभे राहिले. नंतर पोलिसांनी बर्‍याच वेळापर्यत लोकांना समज दिली की ही एक अफवा आहे. तुम्ही लोक इथून निघून जा. दरम्यान पोलिसांनी सांगितले की पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, मात्र असे सांगूनही लोक काही जाण्यास तयार नव्हते, ते म्हणाले की लॉकडाउनमुळे आम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशाला लॉकडाउन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना २१ दिवस घरी राहण्याचे आवाहन केले आहे. या संकटाच्या काळात दैनंदिन मजुरांसमोर खाण्या-पिण्याचे संकट निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अलिगड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यप्रकाश पटेल म्हणाले की हे एक प्रकारचे मिस कम्युनिकेशन आहे. आम्ही नगरसेवक व जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेतली होती, ज्यात नगरसेवकांमार्फत आम्ही नोंदी गोळा करीत आहोत.