भाजपाचे नेते ‘सोशल डिस्टेन्सिंग’चे पालन करण्यास विसरले, एकमेकांना मारली मिठी अन् हार देखील

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोनाशी सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी त्यात थोड्याफार प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी सोशल डिस्टेंसिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करीत आहेत. असे असूनही भाजपा नेत्यांची अशी छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करत त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे.

ही बाब आसामच्या करीमगंज जिल्ह्यातून समोर आली असून, भाजपा नेत्यांनी येथे एक कार्यक्रम आयोजित केला. यावेळी लॉकडाउनचे उल्लंघन तर त्यांनी केलेच, परंतु बैठकीदरम्यान सोशल डिस्टेंसिंगचे देखील पालन करण्यात आले नाही आणि एकाच फुलांच्या माळेत तब्बल चार-चार नेते दिसले. करीमगंज येथील काही भाजपा नेत्यांनी नुकतेच नियुक्त झालेले जिल्हा विकास प्राधिकरण अध्यक्षांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यात माजी आमदार मिशन रंजन दास आणि पक्षाचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या व्हिडिओमध्ये भाजपा नेते व कार्यकर्ते दिसून आले, जे करीमगंज जिल्हा विकास प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष विश्वरूप भट्टाचार्य यांचे कौतुक करताना दिसले. नियमांचे उल्लंघन करत सर्व एकमेकांच्या संपर्कात येताना दिसले. त्याचवेळी भाजपाचे काही नेते एकमेकांना मिठी मारतानाही दिसले. या कार्यक्रमास भाजपा नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.