Coronavirus Lockdown : लॉकडाऊन दरम्यान नियमभंग केल्या प्रकरणी तब्बल 27 हजार 432 गुन्हे दाखल, ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरती आतापर्यंत राज्यात २७,४३२ गुन्हे पोलिस ठाण्यात नोंद झाले आहे. यात, १२ हजार ४२० वाहने जप्त करत त्यांच्याकडून ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंडही पोलिसांनी आकारला आहे.

सध्या राज्यात सगळीकडे जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू आहे. मात्र या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांना नाकीनऊ आले आहे. यामध्ये पुण्यात सर्वाधिक ३ हजार २५५ गुन्हे दाखल झाले आहे. त्यानंतर सोलापूर, अहमदनगरचा क्रमांक लागतो. तर राज्यात ‘होम क्वारंटाइन’ असलेल्यांपैकी ४३८ जणांनी ‘होम क्वारंटाइन’च्या आदेशाची पायमल्ली केली आहे. तसेच व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या काहींनी तर पोलिसांना टार्गेट केलं आहे. यामुळे राज्यभरात संचारबंदी कामावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तब्बल ६० गुन्हे दाखल असून, १६१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

राज्यभरात बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण २७ हजार ४३२ गुन्हे नोंदवले आहे. तर १८८६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पुणे (३२५५), सोलापूर (२५९४), अहमदनगर (२४४९), नागपूर (१९९९), पिंपरी-चिंचवड (१९३३) या ठिकाणी सर्वाधिक गुन्हे नोंदवल्यात आहे. तर मुंबईत (१६७९) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस नियंत्रण कक्षात एकूण ५८ हजार तक्रारी

कोरोना संसर्गाबाबत राज्य पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ५८ हजार तक्रारी आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात आलेल्या एकूण ६ हजार १३ तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. नागपुरातुन सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६८, तर मुंबईतून १४ हजार ६९८ फोन आले आहे. तसेच बुलढाणा व अमरावती मधून एकही फोन आलेला नाही.