….’त्या’ मजुरांनी मांडली व्यथा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  उस्मानाबाद, जालना, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, मराठवाडा, लातूर, विदर्भ या भागामध्ये काही जणांच्या नशिबात दुष्काळ आणि दारिद्र्य पाचवीलाच पुजलेलं आहे. त्यामुळे मागिल काही वर्षांपासून अनेकांनी शहराकडे धाव घेतली. शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने कुशल, अकुशल मजुरांच्या हाताला काम मिळू लागले. अनेकजण स्थायिकही झाले आहेत. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते असेच म्हणावे लागले. कोरोना व्हायरसचा महाभयानक विषाणूचे जगावर संकट कोसळले आणि शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले. एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडली, अशी
व्यथा मजूरांनी मांडली आणि हृदय पिळवटून गेले.

हडपसर गांधी चौकामध्ये दररोज सकाळी शेकडो कुशल

अकुशल मजूर रोजगारासाठी थांबल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, मागिल दीड महिन्यापासून या ठिकाणी एकही मजूर दिसत नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांनी गाव गाठले असले आहे. मात्र, काहींना गाव आणि लॉकडाऊन सारखेच आहे. त्यामळे ही मंडळी येथेच थांबली आहेत. स्वयंसेवी संस्था, संघटनांनी जेवणाची तसेच धान्य वाटपाची सोय केली आहे. त्या मदतीवर ही मंडळी गुजरान करीत आहेत. आता त्यांचा दररोजच्या खर्चाचा प्रश्न गंभीर बनत आहे. मागिल महिन्याची उधारी द्यायची की, दररोजचा खर्च भागवायचा अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे. आमचे नाव टाकू नका नाही तर आम्हाला त्रास होईल, असेही या मंडळींनी सांगितले.

राज्यातील ग्रामीण भागासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर आलेला मजूर उपनगरामध्ये स्थायिक झाला आहे. त्यातील जुन्या मंडळींनी घरे घेतली तर काहींनी भाड्याच्या घरात संसार थाटला आहे. कुशल आणि अकुशल मजूर हाताला काम नसल्याने सध्या जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. लखन घुले (शरद गव्हाण, जि. जालना), रघुनाथ सोनवणे (भाई गव्हाण, जि. जालना), भारत वाकचौरे (तांदूळजा, जि. लातूर), कल्याण खरे (रुपळे, ता. सांगोला, जि. सोलापूर), हरिश्चंद्र गायकवाड (शिरगापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) कुटुंबीयांसह कामासाठी पुण्याला आलो. हडपसर-शिंदेवस्ती येथे स्थायिक झालो आहे. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू झाला. कुटुंबाला हातभार म्हणून बायका-मुलेसुद्धा मजुरीची काम करू लागली. ठेकेदाराकडे काम मिळत असल्याने त्यांचा संसार बऱ्यापैकी सुरळीत सुरू होता. दिवस भरला की ठराविक रक्कम हातात घेऊन येताना भाजीपाला, तांदूळ, डाळ, तेल, मीठ घेऊन घरी यायचे, असा शिरीषचा मागिल अनेक वर्षांचा दिनक्रम सुरू होता. मुले शाळेत जाऊ लागली आणि त्यांची शिक्षणाची प्रगती पाहून ही कुटुंबीय मनोमन सुखावली.

मात्र, मागिल दीड महिन्याभरापासून “करोनामुळे माझ्यासह अनेक गाववाल्यांचे जगणं कठीण झालं आहे. सुरुवातीचे तीन

चार दिवस थोडेफार पैसे हाताशी होते. त्यातून जेवणाचा खर्च निघाला. दरम्यान, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी अन्नधान्य दिले. त्यामुळे पोटाला दोन घास मिळू लागले. मात्र, इतर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला आहे. घरभाडे, मागिल महिन्याचे किराणा दुकानाचे पैसे, दूध आदी खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला, तरी लॉकडाऊन का काय ते सुरूच आहे. ठेकेदाराकडे काम नाही, आता करायचे काय असा प्रश्न पडला आहे.

मागिल दोन वर्षांपूर्वी नोटबंदीच्या काळातही असाच त्रास झाला होता. त्यामुळे आता लॉकडाऊन उठल्यानंतर लगेच सर्व ठिकाणची कामे सुरू होणार का, हासुद्धा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. अनेकांनी गाव गाठले आहे, त्यामुळे रोजगार मागणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी झाली आहे. दरम्यान, गावाकडे गेलेले मजूर आले तर काय करायचे असाही विचार मनात येऊ लागला आहे.

पावसाळा सुरू झाल्यावर काय करायचे

मार्च, एप्रिल व मे या दरम्यान, अनेक बांधकामांवर कामे मिळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला सेंट्रिंगची सर्व कामे उरकली जातात. पाऊस सुरू झाल्यानंतर सेंट्रिंगचे काम फारशी होत नाहीत. त्यामुळे पुढे काय होणार, ही चिंता लागून राहिली आहे. ठेकेदाराकडे अंगावर पैसे मागितले होते; परंतु त्यानेही देण्यास नकार दिला. त्यामुळे करायचे काय, असे एक ना अनेक प्रश्न या मजूरवर्गाला सतावत आहेत.