Coronavirus : दिलासादायक ! देशातील 339 जिल्हे ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या तुमच्या परिसरातील ‘स्थिती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी सकाळपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजार 265 पर्यंत पोहचला आहे. तर 543 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे सध्याच्या घडीला देशातील तब्बल 339 जिल्हे कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे, या भागांना लॉकडाऊनमधून थोडी सूट मिळण्याची चिन्ह आहेत.

आरोग्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण 747 जिल्ह्यापैकी तब्बल 408 जिल्ह्यांतून कोरोनाची प्रकरणे समोर आली आहे. मात्र, सध्या 339 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. केंद्राच्या निर्देशानुसार, राज्यांनी आपआपल्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागलं आहे. जवळपास 180 जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आलंय. तर 238 जिल्ह्यांना ऑरेंज झोन घोषित करण्यात आलंय. 10 किंवा याहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आलंय. या जिल्ह्यांनी लॉकडाऊमधून सूट मिळणार नाही.

महाराष्ट्रातील कोरोनामुक्त जिल्हे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 31 जिल्हे संक्रमणानं ग्रासलेले आहेत. असे असतानाही राज्यातील पाच जिल्हे कोरोनामुक्त आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारनं ग्रीन झोन आणि काही ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन सूट देण्याची घोषणा केली आहे. या जिल्ह्यातील उद्योगधंदे आजपासून सुरु होत आहेत. राज्यात आतापर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशाची राजधानी कोरोनाबाधित

देशाची राजधानी दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे 11 जिल्ह्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण दिल्लीत आढळले आहेत. दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या आता 2003 वर पोहचली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पुढच्या आठवड्यात सूट देण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गुजरात तिसऱ्या क्रमांकावर

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या यादीत महाराष्ट्र आणि दिल्ली नंतर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातच्या 33 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातची राजधानी अहमदाबाद आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनताना दिसून येत आहे. रविवारी राज्यात एकाच दिवशी 367 रुग्ण आढळले. यातील 239 अहमदाबाद मधील आहेत. तर राज्यात आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील गोवा पहिले कोरोनामुक्त राज्य

देशात कोरोनाचा हाहाकार माजवला असताना गोवा राज्य देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य बनले आहे. गोव्यातील सर्व रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्याचं आणि राज्यात एकही नवीन रुग्ण न सापडल्याने गोवा कोरोनामुक्त झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. त्यामुळे गोवा कोरोनामुक्त झाल्याने संपूर्ण राज्यच ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्तर प्रदेशात 56 जिल्ह्यांना सूट

उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यापैकी 48 जिल्हे कोरोनाचे संक्रमण अद्यापही दिसून येत आहे. मात्र 27 जिल्हे सुरक्षित आहेत. तर बरेली, प्रयागराज, पीलीभीत, हाथरस आणि महाराजगंजमध्ये कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. त्यामुळे सध्या 31 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या 56 जिल्ह्यांना केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार सूट दिली जाईल असे सरकारने जाहीर केले आहे.

उत्तराखंडमधील 7 जिल्हे कोरोनामुक्त

उत्तराखंडमधील 14 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, 7 जिल्हे कोरोनापासून दूरच आहेत. राजधानी देहरादूनमध्ये रविवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44 झाली आहे. यातील 11 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राजस्थानमधील 8 जिल्हे सुरक्षित

राजस्थानमध्ये 33 जिल्हे असून यातील 25 जिल्ह्यांत कोरोना संक्रमणाची प्रकरणं समोर आली आहेत. तर 8 जिल्हे अद्यापही सुरक्षित आहे. यामध्ये बारां, बूंदी, श्रीगंगानगर, राजसमंद, सिरोही, चित्तौडगड, सवाई माधोपूर, जालौर हे सर्व जिल्हे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांना सोमवारी लॉकडाऊनमधून सूट देण्याची घोषणा गेहलोत सरकारने केली आहे.

पूर्व भागातील परिस्थिती नियंत्रणात

देशाच्या पूर्व भागातील आसाममधील 33 जिल्ह्यापैकी 11 जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जिल्हे कोरोनापासून दूर आहेत. अरुणाचल प्रदेशात आतापर्यंत केवळ 1 रुग्ण आढळला आहे. मणिपुरच्या 16 जिल्ह्यापैकी पश्चिम इम्फाळ आणि थाबलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर इतर प्रदेश कोरोनामुक्त झाले आहेत. मेघालयात केवळ 11 पैकी केवळ एका जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळले आहेत. मिझोरममध्ये ही 8 जिल्ह्यापैकी केवळ एकाच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्रिपुराच्या 8 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे कोरनामुळे संक्रमित झाले आहेत.

‘या’ जिल्ह्यांना मिळणार सूट ?

पश्चिम बंगालच्या 23 जिल्ह्यातील 15 जिल्ह्यांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 8 जिल्हे अद्यापही कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारकडून काही प्रमाणात सूट मिळू शकते. छत्तीसगडच्या 27 पैकी 5 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जिल्हे कोरोनापासून दूर आहेत. ओडिशामधील 33 पैकी 9 जिल्हे कोरोना बाधित आहेत. तर पंजाबमध्ये 22 पैकी 8 जिल्ह्यांना कोरोनांना ग्रासलंय. पुदुच्चेरीतील 4 पैकी 2 तर अंदमान-निकोबारच्या 3 पैकी एक जिल्हा तसेच चंदीगडमध्येही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.

‘या’ राज्यांना धोका कायम

बिहारच्या 38 जिल्ह्यापैकी केवल 13 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र 25 जिल्हे सुरक्षित आहेत. हरियाणाच्या 22 पैकी 19 जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर चार जिल्हे कोरोनामुक्त आहेत. हिमाचल प्रदेशात 12 पैकी 5 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात 30 पैकी 21, केरळ 14 जिल्ह्यात कोरनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या 14 आणि लडाखच्या 2 जिल्ह्यात कोरोनाची बाधा पोहचली आहे. तामीळनाडूच्या सर्व 34 जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालीय. मध्यप्रदेशात 51 पैकी 26 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु 25 जिल्हे अद्यापही सुरक्षित आहेत. आंध्र प्रदेशात 13 पैकी 11 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर तेलंगणामध्ये 31 पैकी 28 जिल्हे कोरोनाच्या विळक्यात सापडली आहेत.