लॉकडाऊन 4.0 मध्ये बनले 5 झोन, जाणून घ्या काय आहे ‘बफर’ अन् ‘कन्टेंमेंट’ झोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने देशव्यापी लॉकडाऊन 4.0 ला 31 मे पर्यंत वाढवले आहे. यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 5 झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात रेड झोन, ग्रीन आणि ऑरेंज झोन या व्यतिरिक्त बफर झोन आणि कंटेनमेंट झोनचा समावेश आहे. या पाच झोनबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत तीन झोन बनवण्यात आले होते. यामध्ये रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनचा समावेश आहे. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ दैनंदिन अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असणार आहे.

कंटेनमेंट, बफर झोनचा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार

राज्य सरकार रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनचा निर्णय घेणार आहे तर जिल्हा प्रशासन कंटेनमेंट झोन आणि बफर झोन ठरवणार आहे. परंतु या झोनमध्ये गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. कंटेनमेंट झोनमध्ये अधिक कठोरता पाळली जाईल. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून येणार नाही असेच जिल्हे ग्रीन झोनमध्ये असतील. तर दुसरीकडे ज्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये असणार आहेत.

लॉकडाऊन 4.0 दरम्यान, सरकारने आवश्यक खबरदारी घेऊन व्यवसाय सुरु करण्यावर भर दिला आहे. रविवारी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ही माहिती दिली आहे. यानुसार लॉकडाऊन 4.0 दरम्यान मेट्रो, आणि विमान उड्डाणास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, देशांतर्गत वैद्यकीय सेवा, घरगुती हवाई रुग्णवाहिका व सुरक्षा व्यवस्थेसाठी उड्डाणांना परवानगी देण्यात येणार आहे.

लॉकडाऊन 4.0 दरम्यान, शाळा, महाविद्यालये, रेस्टॉरंट्स, हॉटेल, सिनेमा हॉल, मॉल, जलतरण तलाव, थिएटर व बार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन अभ्यास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.