तबलिगींना घरी बोलावून केला ‘पाहुणचार’, आता तब्बल 55 जण रुग्णालयात !

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यातच भर म्हणजे, दिल्लीहून परतलेल्या तबलिगी जमातीच्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा आणखी धोका वाढला आहे. जालन्यात तबलिगी कनेक्शनमुळे संशयितांचा आकडा हा 55 वर पोहोचला आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज तबलिगी जमात कनेक्शनमुळे शहागड जवळील डोनगाव येथून आणखी 9 संशयितांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहागड येथून आधी 26, त्यानंतर 20 आणि आता डोनगावचे 9 असे एका दिवसात एकूण 55 संशयितांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जालनाकरांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.

हे सर्व संशयित जालना जिल्ह्यातील शहागड इथे लातूर येथे पोझिटिव्ह सापडलेल्या दिल्लीच्या निझामुद्दीन मरकज तबलिगी जमातच्या सदस्यांना काही कुटुंबीयांनी घरी बोलावून चहा पाजला होता. सुदैवाने जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पोझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, शहागड येथील या संशयितांच्या तबलिगी कनेक्शनमुळे जालनेकरांची धकधक वाढली आहे. या सर्व संशयित रुग्णांच्या वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांना पण कोरोनांची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.