‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला, पतीचा अपघातात मृत्यू

पंचवटी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु या संचारबंदी दरम्यान नाशिकमध्ये अपघातात एका माजी सफाई कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना नाशिकमधील पंचवटी भागात पहाटे पाचच्या सुमारा घडली आहे. या अपघातात नाशिक महापालिकेच्या माजी सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. किशोर चव्हाण (वय-56) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. किशोर चव्हाण यांची पत्नी देखील नाशिक महापालिकेत सफाई कर्मचारी आहे. मृत अशोक चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून पत्नीला कामावर सोडण्यासाठी जात होते. परंतु पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेटिंगच्या दोरखंडाला अडकल्यामुळे दुचाकी स्लिप झाली.

गाडी स्लिप झाल्याने चव्हाण दांम्पत्य रस्त्यावर पडले. या भीषण अपघातात पत्नी जखमी झाली तर किशोर चव्हाण यांना गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किशोर चव्हाण हे नाशिक महापालिकेत माजी सफाई कर्मचारी होते. चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.