Coronavirus Lockdown : सध्या 2 वेळचं जेवण मिळतंय पण उद्याची चिंता, काय होणार पुढं

पुणे : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी मागिल महिन्याभरापासून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे हाताला काम नाही, रोजगार नाही, अशी भयावह स्थिती आतापर्यंत अनेकवेळा ओला आणि कोरडा दुष्काळ पडला, तरी कधीच आली नव्हती. शासनाने धान्य, अनेक स्वयंसेवी संस्थांनी जेवण देऊ केले. त्यामुळे दोन वेळचे जेवण मिळत आहे. मात्र, उद्याची चिंता सतावत आहे. हडपसर गांधी चौक कामगारांविना ओस पडला आहे. दुकानांचे शटर बंद असल्याने सर्वत्र सन्नाटा दिसत होता.

हडपसर (गांधी चौक) उड्डाण पुलाखाली मागिल अनेक वर्षांपासून हजारो कुशल आणि अकुशल कामगारांची खच्चून गर्दी दिसत होती. मात्र, मागिल महिन्याभरापासून उड्डाण पुलाखाली मजूर दिसेनासा झाला, ही परिस्थिती एकदम कशी बदलला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोजगारासाठी आलेल्या या मंडळींनी लॉकडाऊन जाहीर केल्याबरोबर रातोरात मिळेल त्या वाहनाने, तर काहींनी पायपीट करीत गाव गाठले.

असंघटित क्षेत्रातील व हातावर पोट असलेल्या कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उद्योगधंदे, व्यवसाय, हॉटेल, दुकाने सर्व काही बंद आहे. त्यामुळे हाताला काम नाही आणि काम नाही म्हणून हाती पैसा नाही, त्यामुळे चूल कशी पेटवायची, घर कसे चालवायचे अशा एक ना अनेक प्रश्नांनी सामान्यांना घेरले आहे. खासगी कंपन्यांनी मागिल महिन्यात पगार दिला. मात्र, एप्रिल महिन्याचा पगार मिळणार की नाही, अशा विवंचनेत काही मंडळी आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनाही पूर्ण पगार मिळाला नाही, त्यामुळे ती मंडळीही चिंताक्रांत झाली आहेत.

अठराविशे दुष्काळ नशिबी असल्याने अनेकांनी गाव सोडून शहराकडे धाव घेतली. शहरात मिळेल ते काम करू दोन पैसे मिळवून सुखाचा नाही, तर बेताचा संसार अशी जिद्द बाळगत काही वर्षात अनेकांनी स्वप्न साकार केली आहेत, तर भविष्यात एक चांगले जीवन मिळेल, या आशेपोटी आजही असे असंख्य स्थलांतरीत नागरिकांचा जीवन संघर्ष सुरूच आहे.

हडपसर गांधी चौकात मजूर अड्ड्यावर सकाळी येऊन थांबले की, ठेकेदार येतो, प्रत्येक ठेकेदारा त्यांना ज्या पद्धतीचे कामगार हवे आहेत, त्यांना घेऊन जातो. शहरामध्ये अनेक ठिकाणी मजूरअड्डे आहेत, त्या सर्व ठिकाणी हीच परिस्थिती आहे. कंत्राटदारांच्या मनात आले, तर त्यांना काम मिळते परिणामी त्यांच्या घरातील चूल पेटते. तर हजारोच्या संख्येने मजूर अड्ड्यावरील कामगारांना रोजच कामाचा शोध घ्यावा लागतो, ही परिस्थिती मागिल अनेक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचे जीवन सुरळीत सुरू होते. मात्र, नियतीच्या मनात भलतेच होते असे म्हटले तर वावगे ठरू नये.

चीनपाठोपाठ आपल्या देशातही करोनाचा फैलाव झाला आणि हा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले. आता जवळपास सव्वा महिना लॉकडाऊन आहे. त्यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. त्यामुळे उत्पादन ठप्प झाले, बांधकाम क्षेत्रही ठप्प झाले, दुकाने बंद पडली आणि सर्वच क्षेत्रावर करोनाचे मोठे सावट निर्माण झाले आहे. या संकटकालीन परिस्थितीत या कामगारांचा गुंता अधिकच वाढत गेला आहे. घरगाडा कसा हाकणार, मुलाबाळांना काय खाऊ घालायचे, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.

मजूर अड्ड्यावर विविध क्षेत्रात काम करणारे बहुतेक कामगार हे बाहेरगाव वा परराज्यातील आहेत. लॉकडाऊनमुळे गावी जात येत नाही, तर येथे खाण्यासाठी पैसा हाती नाही, अशा कठीण काळातून त्यांना जावे लागत आहे. एका बाजूला त्यांच्यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहे. फूड पॅकेट, किराणा साहित्याचे किट वाटप केले जात आहे. परंतु ही मदत सर्वदूर होत आहे, असे नाही. तर सर्वांकडेच रेशनकार्ड आहे, असेही नाही. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्यांना स्वस्तधान्य दुकानातून धान्य देण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या पदरी काहीच पडले नाही, असे मजूरवर्गाकडून सांगण्यात आले.

करोनाच्या साथीतून वाचायचं आहे, ही गोष्ट मान्य केली, तरीही कुटुंब सावरण्यासाठी जगायचं देखील आहे, ही गोष्ट कशी साध्य करायची, अशी विचाऱणा आता कामगारवर्ग करू लागला आहे. कोरोनातून सावरण्यासाठी आम्ही जीवंत असो पाहिजे, असे खडे बोलही अनेकांनी सुनावले. कंत्राटी तसेच नाक्यावरील कामगारांसह घरेलू कामगार, बांधकाम मजूरांसह अन्य असंघटित कामगारांसह फुटकळ विक्रेत्यांची, रिक्षाचालकांची परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही.
करोना प्रादुर्भावावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अनुपस्थित राहिलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांचे रोजगार-वेतन कपात करू नये, असे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. मात्र, हा नियम कितीजण पाळणार याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. त्यात गंभीर परिस्थिती असंघटित कंत्राटी कामगारांची आहे. यासह घरेलू कामगार, बांधकाम कामगार यांना ठेकेदाराकडून पगार मिळेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आधीपासून असलेला ‘स्लो-डाऊन’ त्यात करोनाचे हे संकट यामुळे आहे तो रोजगार हातचा जाईल का, अशी भीतीही कामगारवर्गात वाढत आहे.

शासनाची मदत कोणाला….
इमारत व अन्य बांधकाम कामगार अडचणीत सापडले, म्हणून मदतीसाठी शासनाने हात पुढे करत महिन्याकाठी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अटी शर्तींमुळे सर्व बांधकाम कामगारांना त्याचा काही लाभ होताना दिसत नाही. अनेकांची नोंद नाही, अनेकांना या गोष्टी माहितच नाहीत, त्यामुळे शासनाची मदत नेमकी कोणाला मिळणार याचे उत्तरसुद्धा गुलदस्त्यात आहे.

आतापर्यंत ओला आणि कोरडा असे दुष्काळ आले आणि गेले, त्यातून सावरलो आहे. तसेच, आज ना उद्या करोनाचे संकट दूर होईल. परिस्थिती सर्वसामान्य होईल, मात्र या कामगारांवर आलेले संकट कसे दूर होणार हाच खरा प्रश्न आहे. रोजीरोटीचा प्रश्न असणारे हे कामगार लाखोंच्या घरात असून, ते असंघटित आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांचा कोठेही आवाज नाही. रोज त्यांचा आक्रोश सुरू आहे. मात्र, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही, हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे किमान पुढील काळात तरी त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान व्हावी, रोजीरोटीचा कोठेही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा ‘करोना’च्या संकटापेक्षा सामाजिक परिस्थिती बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

आज अक्षयतृतियेचा मुहूर्त साधून मराठी माणसाचे नवीन वर्ष आजपासून सुरू होत आहे. पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत गोडधोड जेवण करून अक्षय तृतीया सण साजरा करण्याची परंपरा आमची आहे. अक्षय तृतियेला बहुतेक मंडली सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, आज लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आणि दुकानांचे शटर बंद अशी स्थिती आहे. दुकानासमोर फक्त वॉचमन काठी घेऊन उभा असलेला दिसत आहे. तर बाजारात रस्त्यावर भाजीपाला आणि स्वस्तधान्य, किराणा मालाची दुकाने उघडी असल्याचे दिसत आहे. म्हणजे मानवाच्या गरजा किती आहेत, हेसुद्धा या निमित्ताने समोर आले आहे, अशी चर्चा पोक्त मंडळींमध्ये सुरू आहे.