कल्याण-डोंबिवलीत पुन्हा Lockdown लागू होणार ? पालमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण डोंबिवलीत कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन हजारापेक्षा अधिक होती. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आमदारांनी शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी शनिवारी (दि.20) पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे. किमान 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या पातळीवर शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली.

या बैठकीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी उपस्थित होते. अनलॉकमध्ये शहरातील जनजीवन पुन्हा सुरु झाले होते. लोकांना दिलासा मिळत होता. मात्र, शेजारच्या भिवंडी महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महासभेने शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून मृतांची संख्या 69 वर पोहचली आहे.

कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी पुन्हा 15 दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या या मागणीला आमदार चव्हाण, गायकवाड भोईल यांनी उचलून धरले. या मागणीचा विचार प्रशासनाने करावा अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. सध्या कंटेनमेंट झोनचे पालन केले जात असले तरी रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. बैठकीमध्ये 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने अथवा एकाच वेळी करण्यासाठी वर्कआऊट केले जाईल असे आयुक्त सूर्यंवंशी यांनी स्पष्ट केले.