‘लॉकडाऊन’मुळं माहेरी अडकली पत्नी, पतीनं बोलावल्यावर वेळेवर येऊ न शकल्यानं पतीनं केलं प्रेयसीशी लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाचा धोका लक्षात घेता 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. येण्या-जाण्याची सर्व साधने बंद आहेत. प्रियजनांपासून दूर अडकलेले लोक इच्छा असतानाही त्यांना भेटण्यास असमर्थ आहेत. दूरवरुनच त्यांच्या प्रकृतीची देवाकडे प्रार्थना करत आहेत. या दरम्यान एक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल.

प्रकरण बिहारच्या दुल्हिन बाजार क्षेत्रातील आहे, जेथे एक महिला आपल्या माहेरी गेली होती. यावेळी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे ती आपल्या पतीच्या घरी येऊ शकली नाही. पतीच्या आवाहनानंतरही जेव्हा ती महिला वेळेवर घरी येऊ शकली नाही, तेव्हा नवऱ्याने त्याच्या प्रेयसीशी लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, भरतपुरा येथील रहिवासी धीरज कुमार याचे काही वर्षापूर्वी करपी भागातील पुराण या परिसरात लग्न झाले होते.

काही कामानिमित्त धीरजची पत्नी काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती. यावेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, त्यामुळे ती पुन्हा भरतपुरा येथे येऊ शकली नाही. दरम्यान धीरजने पत्नीला परत येण्यास सांगितले. लॉकडाऊनमुळे धीरजची पत्नी पतीने बोलावल्यावरही परत येऊ शकली नाही. याचा राग आल्याने धीरज कुमारने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने खिरीमोर क्षेत्रातील रघुनाथपूर येथील आपल्या प्रेयसीशी दुसरे लग्न केले. धीरजच्या पहिल्या पत्नीला याची माहिती मिळताच तिने दुल्हिन बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिल्या पत्नीने दुल्हिनबाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तिने पती व सासऱ्यांवर हुंड्याबद्दल छळ व दुसरे लग्न केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून दुल्हिनबाजार पोलिसांनी पती धीरज कुमार यास चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून धीरजला तुरूंगात पाठविले आहे.