राज्य शासनाने घाई करु नये ! आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला ‘सल्ला’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून ठिकठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. मद्यविक्री सुरु झाल्याने रखडलेल्या अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात परिस्थितीनुसार मद्यविक्री दुकाने सुरु केली जावीत असा सल्ला भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

शेलार यांनी ट्विट करुन, केंद्राने सूचना दिल्या असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार,पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.

दारूविक्रीमुळे भल्या सकाळपासूनच मद्यविक्री दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या. दुकाने सुरू होण्याच्या आधीपासूनच अनेक मद्यप्रेमी रांगेत उभे होते. यावेळी अनेक ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आला. काही दुकानांसमोर चक्क रेटारेटीची परिस्थितीही निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी कठोर पवित्रा घेत ग्राहकांना पिटाळून लावले. तर काही भागांत दुपापर्यंत दुकाने न उघडल्याने मद्यप्रेमींना रिकाम्या हाताने परतावे लागले.

प्रत्येक दुकानात तीन ते चार व्यक्ती काम करतात. इतक्या व्यक्तींना शंभर, दोनशे जणांचा जमाव नियंत्रित ठेवणे शक्य नाही. पोलिसांवरही प्रचंड ताण आहे. त्यामुळे मद्यप्रेमींनीच संयम, शिस्त बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.