चीननं भारतावरच फोडलं खापर, म्हणाले – ‘आम्ही दिलेल्या रॅपिड टेस्ट किट उत्तम, भारतीयांना वापरता येत नाहीत’

पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला आहे. मात्र चीनमध्ये या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणार्‍या कंपनीने आपल्या किटमध्ये काही समस्या नसून भारतातील आरोग्य कर्मचार्‍यांकडून त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा दावा केला आहे.

भारतात चीनकडून एकूण पाच लाख टेस्टिंग किट आयात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विविध राज्यांमध्ये या किटचे वाटप करण्यात आले होते. राजस्थान आणि पश्चिम बंगाल सरकारने हे किट चुकीचे निकाल दाखवत असल्याची माहिती दिली होती. याची दखल घेत आयसीएमआरने सर्व राज्यांना किटचा वापर थांबवण्याचा आदेश दिला. या किटचा वापर फक्त पाळत ठेवण्यासाठी केला जावा असे सांगण्यात आले. आयसीएमआरकडून या किटचे टेस्टिंग केले जात असून जर किट सदोष आढळले तर चीनमधील या कंपन्यांसोबतचा करार रद्द करण्यात येईल अथवा त्यांना नव्याने किट पाठवण्यास सांगण्यात आले.

किटवरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर चीनमधील संबंधित कंपन्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या किटमध्ये कोणताही दोष नसून जगभरात ते पाठवले जात असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांनी किटचा सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे योग्य रितीने वापर करावा असा सल्लाही दिला आहे.