नालासोपार्‍यात संतप्त प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर उतरुन गोंधळ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालये सुरु झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करत आहेत. पण सकाळी एसटी सेवा आणि एसटी स्टँड बंद असल्या कारणाने प्रवासी संतापले. यावेळी प्रवाशांनी थेट नालासोपारा रेल्वे स्टेशन गाठून ट्रॅकवर उतरले. यावेळी प्रवाशांनी आम्हाला लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

नालासोपारा एसटीतून खासगी कार्यालय कर्मचार्‍यांना अचानक प्रवासाची मुभा नाकारण्यात आली. एसटी गाड्या नालासोपारा आगारात कमी पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव त्या परिसरात जास्त आहे असे कारण एसटी महामंडळ अधिकारी सांगत आहेत. 8 जूनपासून खासगी कार्यालय कर्मचारी यांना एसटीतुन प्रवासाची मुभा देण्यात आली असतानाही हा प्रकार घडल्याने प्रवासी संतापले होते. नालासोपारा येथील लोक सकाळी एसटी स्टँडवर पोहोचले असता सेवा बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठले.

पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. पण प्रवाशांनी आपल्यालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत रेल्वे ट्रॅकवर उतरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली.