‘कोरोना’सह GST आणि नोटबंदी ; हॉवर्डमध्ये अपयशाच्या केस स्टडी म्हणून शिकवल्या जातील : राहुल गांधी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत कोरोनाबाधित देशांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोनाच्या स्थितीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

ट्विटरला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवले जाईल, असा टोला लगावला आहे . या व्हिडीओत नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना व्हायरसविरोधातील लढाई 21 दिवसांमध्ये जिंकू असे सांगत आहेत.

लढाईला 100 पेक्षा जास्त दिवस झाले असून भारत जागतिक देशांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर असल्याचेही दाखवण्यात आले आहे.लॉकडाउनला तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही. सध्या देशात जवळपास 7 लाख करोनाचे रुग्ण असून 19 हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.