Coronavirus : कौतूकास्पद ! डॉक्टरांनी मदतीसाठी सुरू केली खाजगी हेल्पलाईन, मिळवा थेट तज्ज्ञांची मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाव्हायरस च्या संकटामुळे संपूर्ण जग चिंतित असून भारतातही याला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू असून लोकांमध्ये काळजी आणि घबराटीचे वातावरण आहे. याचे प्रमुख कारण रोगापेक्षा त्याबद्दचे अज्ञानच अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काही तरुण डॉक्टरांनी पुढाकार घेऊन एक कौतुकास्पद उपक्रम राबवला असून ते हेल्पलाईनद्वारे लोकांमध्ये जनजागृतीचे आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम करणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील एकूण 50 MBBS डॉक्टरांचा गट जिल्हानिहाय स्वयंसेवीपणे कार्यरत असणार आहे. कोरोनासंबंधी कसल्याही मदतीसाठी आपल्या खाजगी नंबरवर कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अशी बनली हेल्पलाईन
नागरिकांसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्याची संकल्पना पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि ससून हॉस्पिटल येथे कार्यरत डॉ. सुहास मैड आणि डॉ. ज्ञानेश्वर यांची आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा तांत्रिक यंत्रणेची मदत न घेता स्वतःचे खाजगी नंबर या 50 डॉक्टरांनी दिले आहेत ज्यावर नागरिक सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत कधीही संपर्क साधून मदत घेऊ शकतात. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र डॉक्टर दिले असून नागरिकांनी निःसंकोचपणे त्यावर संपर्क साधून मदत मिळवण्याचे आवाहन डॉ.सुहास आणि सहकाऱ्यांनी केले आहे.

लॉकडाऊन नंतर लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून सर्दीसारख्या सामान्य आजारासाठी देखील लोक सरकारी तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. लोक अधिकृत महितीऐवजी व्हाट्सएप इत्यादी सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे पसरलेले भीतीचे वातावरण लक्षात घेऊन WHO आणि भारत सरकारने हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. परंतु 130 कोटी लोकसंख्येसमोर ही यंत्रणा तोकडी पडत होती. अशा परिस्थितीत लोकांना दिलासा आणि सल्ला देण्याचं महत्त्वाचं काम या हेल्पलाईन द्वारे होणार आहे.

हेल्पलाईन ची उद्दिष्टे
– लोकांना समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार देणे.
– आरोग्याच्या तक्रारींबाबत गरजू नागरिकांना वैद्यकीय सल्ला पुरवणे.
– गैरसमज दूर करून लोकांपर्यंत अधिकृत माहिती पोहोचवणे.
– एकंदर परिस्थितीबद्दल नागरिकांना योग्य माहिती देऊन घराबाहेर पडण्यापासून रोखणे आणि शासकीय उपाययोजनांना पाठबळ पुरवणे.
– कोरोनासंबंधी कोणतीही अत्यावश्यक मदत मिळवून देणे.

बातमीसोबत आम्ही फोटो देत आहोत ज्यामध्ये जिल्हानिहाय या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक दिले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like